राज्यभर गणरायाच्या विसर्जनाचा उत्साह आहे. गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनापासून पुन्हा बरसायला सुरुवात केली. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. तर, आता विसर्जनालाही गणरायावर मेघवर्षाव होत आहे. दरम्यान, पुढचे ४८ तास महाराष्ट्रात यलो यलर्ट जारी करण्यात आला. तर, कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
आज सकाळपासून मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणपती मंडळांचे बाप्पा विसर्जनासाठी मंडपाबाहेर पडले. तसंच, गणरायाच्या स्वागतासाठी जलधारांनीही सुरुवात केली. भरपावसात ढोल-ताशा-लेझिमच्या तालात बाप्पाला निरोप दिला जातोय.
आज कुठे कुठे आहे पाऊस?
मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना,सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, नागपूर, भंडारदरा, गोंदिया, अमरावती, आदी जिल्ह्यांमध्ये २८ सप्टेंबरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच, येथे पावसाच्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने तिथे अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम येथे ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या महाराष्ट्रभर काय असणार परिस्थिती?
मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारदरा, गोंदिया आदी ठिकाणी यलो अलर्ट दिल्याने येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्रात तुरळक सरी कोसळतील.