बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पश्चिम बंगालमध्ये पावसाने कहर केला असतानाच विदर्भावरही पाऊस मेहेरबान झाला आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर दणदणीत पुनरागमन केलेल्या पावसाने विदर्भात सर्वदूर हजेरी लावली आहे. सोमवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस नागपूरसह अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम या सर्वच जिल्ह्य़ांत पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. विदर्भावर कृपादृष्टी दाखवणारा पाऊस राज्याच्या इतर भागांवर मात्र रुसलेलाच आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोमेन वादळाची निर्मिती झाली. परिणामी पश्चिम बंगालला पावसाने कह्य़ात घेतले. या वादळाचा प्रभाव संपूर्ण विदर्भावर दिसून येत आहे. पावसाने प्रदीर्घ काळ ओढ दिल्यानंतर रविवारी नागपूर शहरातील काही भागांत तुरळक सरी तर काही भागांत जोरदार पाऊस बरसला. सोमवारी सकाळपासून मात्र त्याने नागपूरसह विदर्भात ठाण मांडले. हा संततधार पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा असल्याने शेतकरी सुखावला असून निसटलेली पिके पुन्हा हाती येण्याची आस त्यांना आहे. विशेषत: धानाला अधिक पाणी लागत असल्याने धान उत्पादक शेतकरी आनंदला आहे. दरम्यान, विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागांत नाममात्र पावसाची नोंद झाली. मात्र बुधवारसह येत्या दोन दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात चांगल्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात दमदार पाऊस पडत असताना मंगळवारी राज्याच्या इतर भागांत हलका पाऊस पडला. पुण्यात दिवसभरात ०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय कोल्हापूर (१), सातारा (१), नाशिक (०.५), जळगाव (१४), मुंबई (२), अलिबाग (२), रत्नागिरी (०.१), औरंगाबाद (११) येथेही पाऊस पडला. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या दोन-तीन दिवसांत पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा