दीक्षाभूमीवरील ५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी आलेल्या लाखो बौद्ध धम्मबांधवांची अचानक आलेल्या पावसामुळे रविवारी चांगलीच दाणादाण उडाली. व्यासपीठावरील नेतेमंडळींना पावसापासून संरक्षणाची पूर्ण व्यवस्था आंबेडकर स्मारक समितीने केली होती. परंतु, कार्यक्रमासाठी आलेले बौद्ध भिक्खू आणि धम्मबांधव आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसह पावसापासून वाचविण्यासाठी अक्षरश: आडोसा शोधत राहिले.
नागपूर महापालिकेने महापालिकेच्या मालकीच्या सर्व शाळा धम्मबांधवांसाठी खुल्या करून दिल्या असताना दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मात्र स्मारक समितीने कुलूपबंद करून ठेवले होते. महाविद्यालयाच्या आवारात एकाही धम्मबांधवाला प्रवेश नव्हता. त्यामुळे आडोसा शोधता शोधता लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. दीक्षाभूमी परिसरातील मैदानही पावसामुळे निसरडे आणि ओले झाले होते. त्याचाही फटका लोकांना बसला. या पळापळीत चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने असे काहीही घडले नाही. परंतु, विदर्भातील यंदाच्या अतिवृष्टीचा कहर पाहता पावसाळा अद्यापही संपला नसल्याने पावसाची शक्यता लक्षात घेऊन स्मारक समितीने भाविकांच्या संरक्षणासाठी व्यवस्था करावयास हवी होती, असे अनेक संतप्त धम्मबांधवांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मपरिवर्तन करून बुद्ध धर्मात प्रवेश केला होता. हा ऐतिहासिक सोहळा दीक्षाभूमीच्या मैदानावर झाला होता. या ठिकाणी आता मोठा स्तूप उभारण्यात आला आहे. परंतु, भाविकांसाठी पुरेशा सोयी नसल्याच्या तक्रारी दरवर्षीच्याच आहेत. धम्मबांधवांची संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या मालकीच्या शाळा धम्मबांधवांच्या निवासासाठी खुल्या करून देण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत दीक्षाभूमीवरील सोयी मात्र अत्यंत अपुऱ्या पडत आहेत. लोकांची होणारी गर्दी ही सर्वात मोठी समस्या आहे. एखादे वेळी जोरदार पाऊस कोसळल्यास भाविकांसाठी दीक्षाभूमी परिसरात कुठेही आश्रयस्थान नाही. मंडपही उभारला जात नाही. त्यामुळे धम्मबांधव अक्षरश: पावसात भिजत राहिले. यातून अनेकांच्या संतापाचा स्फोट झाला. लोकांची पावसापासून वाचण्यासाठी धावपळ सुरू असताना नेत्यांची भाषणेही सुरू होती. ताडपत्रीच्या आडोशाखाली बसलेले नेते जोरजोरात भाषणे ठोकत असताना लोक पावसात भिजत होते. त्यामुळे नेत्यांच्या भाषणांकडे लोकांचे लक्ष नव्हते. या वर्षी दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये रा. सू. गवई आणि सदानंद फुलझेले यांच्या विरोधातील पोस्टर्स झळकले. एका महिला संघटनेने दोन्ही नेत्यांविरुद्ध ही पोस्टरबाजी केली.