शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयानंतर विरोधकांकडून मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. श्रेय लाटण्यासाठीच हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. दरम्यान, सपा पक्षाचे आमदार रईस शेख यांनीदेखील लोकांचा रोष लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे. तसेच श्रेय लाटण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा >>> “हीच ती वेळ” म्हणत आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना केलं आवाहन, म्हणाले…
“आज महाराष्ट्रात पूरस्थिती आहे. याच काणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाची बैठक बोलावतील, असे मला वाटले होते. लोकांचा त्रास, विकास यावर चर्चा केली जात नाही. महाराष्ट्राची परिस्थिती सध्या वाईट आहे. त्याकडे लक्ष द्यायला हवे. हे राजकारण लोकांना नको आहे. नामकरण करुन औरंगाबाद तसेच उस्मानाबादचा विकास होणार नाही. विकासावर लक्ष द्यावं. औरंगाबाद, उस्मानाबाद करुन वाद निर्माण केला जातोय. सर्वांना न्याय देणारे, सर्वांचा सन्मान करणारे हे सरकार आहे; असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र हे सरकार श्रेय लाटणारे आणि भावनिक मुद्द्यांना हात घालणारे आहे,” असा घणाघाती आरोप रईस शेख यांनी केला.
हेही वाचा >>> “…म्हणून यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी”; प्रकाश आंबेडकर यांची विनंती
“औरंगाबाद तसेच उस्मानाबाद हे शहर तेथील लोकांचे आहे. तेथील लोकप्रतिनिधी काय म्हणतात? तसेच नागरिकांची काय भावना आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. पण आज लोकशाही कुठे आहे? भारातामध्ये लोकशाही नाही. निर्णय घेताना लोकशाही पद्धत वापरली जात नाही. लोकांचा रोष बघता निर्णयाला स्थगिती द्यावी,” अशी मागणी शेख यांनी केली.
हेही वाचा >>> “…तेव्हाच जल्लोष करू,” औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर चंद्रकांत खैरेंचे शिंदे सरकारला आव्हान
शहरांच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षालाही लक्ष्य केले. “राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आक्षेप घेतला नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून दुटप्पीपणाची भूमिका घेतली जात आहे. त्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि लोकांची जाहीर माफी मागावी. तुमचा यात सहभाग होता, हे इतिहासात लिहिले जाईल,” अशी टीका रईस शेख यांनी केली.