‘‘एकत्र येण्याची भाषा वृत्तपत्रांतून चालत नाही. लग्न करायचे तर मेळावा घ्यायचा नसतो, चर्चा करायची असते. राज्यात कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा विचार नाही. स्वबळावर लढून जिंकायचे आहे. त्यासाठी राज्य काबीज करण्याच्या हेतूने दौऱ्याला सुरुवात केली आहे, असे स्पष्ट करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘टाळी’च्या अपेक्षेला टोला दिला.
 राज यांची मंगळवारी रात्री येथील गांधी मैदानात विराट सभा झाली. तासाभराच्या भाषणात त्यांनी टोल आकारणी, स्मारक, महिला समस्या, अल्पसंख्याकांचे लांगुलचालन आदींचा समाचार घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या केंद्र व राज्यातील नेत्यांची नक्कल करीत त्यांना फैलावर घेतले. टाळीसाठी वृत्तपत्रांतून आवाहन करण्याच्या पध्दतीला टोला देताना ते म्हणाले, एकत्र येण्याची भाषा वृत्तपत्रांतून चालत नाही. लग्न करायचे तर मेळावा घ्यायचा नसतो, चर्चा करायची असते.
तासगावात शाखा सुरू करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत आहेत. यापुढे असे कोण आडवे आले तर आर. आर. पाटील यांच्या घरच्यांना माझ्याकडून धमकी पोहचेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. स्पर्धा परीक्षेसाठी हिंदी व उर्दू भाषा वापरात आणण्याच्या धोरणासही त्यांनी प्रखर विरोध दर्शविला. राज्यामध्ये गोंधळाचे चित्र निर्माण झाले की, स्मारकाचा विषय पुढे आणून भावनिक विषयांच्याआधारे लक्ष विचलित करण्याची खेळी सत्ताधाऱ्यांकडून केली जाते, असे नमूद करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाचे दाखले दिले. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापेक्षा राज्यातील किल्लेरुपी शिवरायांचे स्मारक दुरुस्त करावे, अशी सूचना त्यांनी केली राज्य शासनाच्या टोल आकारणीच्या धोरणावरही त्यांनी टीका केली.

Story img Loader