सावंतवाडी : प्रकल्पाच्या नावे जमिनींमध्ये दलाली करायचे हे अडीच वर्षे राहिलेल्या मागील सरकारचे उद्योग राहिले. तर इथल्या खासदाराने केवळ प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे कोकणचा विकास थांबला. मात्र आताच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे मोठया मताधिक्याने विजयी होऊन मोदींच्या मंत्रिमंडळात पुन्हा सहभागी होतील आणि येथील प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळेल, असा विश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथे आयोजित सभेत राज म्हणाले की, तुम्हाला नुसता बाकडयावर बसणारा खासदार पाहिजे, की केंद्रात मंत्री होऊन विकास करणारा खासदार पाहिजे, हे ठरवण्याची वेळ आली आहे असे राज ठाकरे यांनी सभेत स्पष्ट केले.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंना लोकांचा प्रतिसाद नसल्याने त्यांच्यात मोठे नैराश्य; मंत्री शंभूराज देसाई यांचे टीकास्त्र
‘काहींना ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात बोलण्यासाठी पगार’
चिपळूण: या राज्यात काही लोकांना ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात बोलण्यासाठी पगार मिळतो, अशी टीका युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केली. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी चिपळूणात आदित्य यांची सभा झाली. या सभेत भाजप, तसेच महायुतीचे नारायण राणेंवर टीका करताना ते म्हणाले की, काही लोकांना ‘मातोश्री’आणि ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात बोलण्यासाठी पगार दिला जातो. दिवस-रात्र त्यांना केवळ आमचेच कुटुंब दिसते. मी त्यांचा विचारही करत नाही. मात्र अशा लोकांना घरी बसवण्याची गरज आहे. मतदारांनी याबाबत विचार करायला हवा. कारण अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे कोकणची संस्कृती बिघडत असेल तर त्यांना धडा शिकवला पाहिजे.
कोकणात उद्योग आला, की उद्धव ठाकरेंचा खासदार त्याला विरोध करणार. प्रत्येक प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवणार. त्यामुळे येथील विकास थांबला आहे. कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही, ही भूमिका येथील खासदाराची आहे. – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष