मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आखला असताना उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, तेव्हाच आपण त्यांना अयोध्यात पाऊल ठेऊ देऊ, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे विरुद्ध बृजभूषण सिंह यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसत होतं.
पण शनिवारी खासदार बृजभूषण सिंह पुण्यात आले आहेत. पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला ते उपस्थित राहिले. मनसेकडून बृजभूषण यांचा कसलाही विरोध करण्यात आला नाही. तसेच “राज ठाकरे यांचा मी सैद्धांतिक मुद्यावर विरोध केला होता. त्यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाहीत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये कधीच दुरावा नव्हता. दोन्ही राज्यांचे आपसात प्रेम आहे. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. माझाही कधी महाराष्ट्राला विरोध नव्हता” अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली.
यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वादाबाबत सूचक विधान केलं आहे. बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंची भूमिका पटली असावी, अशा आशयाचं विधान बाळा नांदगावकर यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
नक्की पाहा- Photo: राज ठाकरेंना नडणारे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप; काय आहे वाद?
यावेळी नांदगावकर म्हणाले की, “बृजभूषण सिंह हे खासदार आहेत, त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो. राज ठाकरे कधीच कुणाचा द्वेष करत नाहीत. राज ठाकरे सगळ्यांचा सन्मान करतात, हे निश्चितपणे बृजभूषण सिंह यांच्या लक्षात आलं असावं. राज ठाकरेंचा मुद्दा एवढाच होता की, स्थानिक तरुणांना त्या-त्या राज्यातील नोकरी किंवा व्यवसायांमध्ये प्राधान्य मिळावं, एवढीच त्यांची भूमिका असते. हीच भूमिका राज ठाकरेंनी मांडली होती. ही भूमिका आता बृजभूषण सिंह यांच्या लक्षात आली असावी,” असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वाद मिटल्याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.