Raj and Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघंही आज एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? या चर्चा कायमच सुरु असतात. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवा पक्ष स्थापन केल्यापासून या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान २०१९ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक आली होती तेव्हा राज ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर होते. मात्र २०२२ नंतर राज ठाकरे महायुतीबरोबर गेले. आता आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले. या दोघांमध्ये चर्चाही झाली. ती काय होती त्याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र आता हे दोन नेते एकत्र आल्याने महापालिका निवडणुकीच्या आधी काही सूत्रं बदलतील का या चर्चांना मुंबईतल्या राजकीय वर्तुळात हे दोन बंंधू आणि राजकीय नेते एकत्र येतील अशा चर्चां सुरु झाल्या आहेत. मुंबईतल्या दादर या ठिकाणी असलेल्या राजे शिवाजी महाविद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी हे दोन्ही नेते सहकुटुंब पोहचल्याचं पाहण्यास मिळालं.
राज ठाकरेंची सुरुवात शिवसेनेपासूनच
राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासूनच केली होती. मात्र त्यांनी पक्ष सोडला आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे वेगळे झाले होते. तसंच उद्धव ठाकरे हे सुरुवातीला राजकारणात सक्रिय नव्हते. जेव्हा उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाले तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशी दोन सत्ताकेंद्रं शिवसेनेत नंतर निर्माण होऊ लागली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी कुणालाही राजकीय वारस असं जाहीर केलं नाही. मात्र राज ठाकरे यांची घुसमट वाढू लागली आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला आणि मराठीचा मुद्दा उचलून धरला होता. २०१४ मध्ये त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीला तर २०२४ मध्ये महायुतीला पाठिंबा दिला. त्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे त्यांचं राजकारण काहीसं अस्थिर राहिलं. मात्र काका बाळासाहेब ठाकरेंना आपला विठ्ठल मानून त्यांनी राजकारण केलं. या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आलं. आता महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने या भेटीकडे पाहिलं जातं आहे.
उद्धव ठाकरेंचं संयत राजकारण
उद्धव ठाकरेंनी २०१९ पर्यंत संयत म्हणता येईल असंच राजकारण केलं. बाळासाहेब ठाकरेंसारखा आक्रमक बाणा, स्पष्टवक्तेपणा दिसला नाही. मात्र त्यांनी पक्ष बराच वाढवला. २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदावरुन भाजपाशी वाद झाल्यानंतर त्यांनी युतीची साथ सोडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह हातमिळवणी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्या काही चुकीच्या धोरणांबाबत न पटल्याने २०२२ ला शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह इतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे २० आमदार निवडून आले आहेत. तर दुसरीकडे महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. उद्धव ठाकरेंनीही आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या अनुषंगाने राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातली भेट सूचक मानली जाते आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन नेते एकत्र येतील का? या चर्चा आता रंगल्या आहेत.