Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना साद-प्रतिसाद दिल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारं राजकीय कुटुंब आणि पर्यायानं दोन प्रमुख राजकीय पक्षात युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेवर राजकीय पक्षांचे नेते, विश्लेषक यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ठाकरे कुटुंबातूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांची आतेबहीण किर्ती फाटक यांनी यावर भाष्य केले आहे. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत किर्ती फाटक यांनी म्हटले की, असे झाले तर प्रत्येक मराठी माणसाप्रमाणे आम्हालाही आनंदच होईल आणि हे लवकरात लवकर घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहोत.

किर्ती फाटक पुढं म्हणाल्या, “माझी आई आज हयात नाही. दोघे भाऊ एकत्र यावेत, अशी तिचीही इच्छा होती. तिची इच्छा पूर्ण झाली तर आम्हाला आनंद होईल. दोन भावांची जेव्हा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असते, तेव्हा इतरांनी त्यात बोलू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे बाकीच्यांनी फक्त वाट पाहावी. सकारात्मक विचार करणारे काही लोक त्यांच्या आजूबाजूला आहेत. तसेच नकारात्मक विचारांचेही काही लोक आजूबाजूला असतील. त्यामुळे त्या दोघांना निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा. ते योग्य निर्णय घेतील, असं मला मनापासून वाटतं.”

दोघेही एकत्र आले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम होईल. मराठी माणसाला राज्यात सुखानं आणि सुरक्षितपणे जगता येईल, असेही किर्ती फाटक म्हणाल्या.

बाळासाहेब आज असते तर…

“बाळासाहेब ठाकरे आज असते तर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती निश्चितच वेगळी असती. त्यातही राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांना आनंदच झाला असता. बाळासाहेब असते तर त्यांनी दोघांनाही बोलावून पाठिवर एक थाप दिली असती आणि “शाब्बास रे माझ्या वाघांनो…”, अशा शब्दात शाबासकी दिली असती”, असेही किर्ती फाटक म्हणाल्या.