दोन आडनावांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अधुरं आहे. पहिलं आडनाव आहे ठाकरे दुसरं आडनाव आहे पवार. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम कायमच केलं. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात कायमच चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याचं कारण या दोन ठाकरे बंधूंनी केलेली दोन वक्तव्यं ठरली आहेत. मात्र हे खरंच घडेल का? याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘जय महाराष्ट्र-हा शिवसेना’ नावाचा इतिहास आहे या पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर यांनी भाष्य केलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा का सुरु झाल्या?
राज ठाकरेंनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत महाराष्ट्रासाठी आमच्यातलं भांडण खूप छोटं आहे वगैरे म्हणत उद्धव ठाकरेंना टाळी देण्याची भाषा केली. तर उद्धव ठाकरे यांनीही हाळी देऊन भाजपाच्या लोकांना जवळ करु नका अशी एक छोटीशी अट ठेवत राज ठाकरेंशी हातमिळवणीची तयारी दर्शवली. त्यातून या चर्चा सुरु झाल्या. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येतील का? याचं ठोस उत्तर आज तरी कुणाकडेच नाही.
शिवसेना सोडताना राज ठाकरे काय म्हणाले होते?
“माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे. त्यामुळे मी शिवसेनेच्या सगळ्या पदांचा आज राजीनामा देत आहे.” असं राज ठाकरेंनी जाहीर करुन पक्ष सोडलं. बाळासाहेब ठाकरेंची भेट घेऊन पक्ष सोडला. राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या ‘विठ्ठलाभोवतीचे बडवे’ आजही आहेत. उद्धव ठाकरेंच्या सततच्या वर्चस्वाच्या राजकारणाला कंटाळूनच राज ठाकरेंनी पक्ष सोडला असंही सांगितलं जातं. तर उद्धव ठाकरे यांनीही वारंवार राज ठाकरेंवर अगदी पातळी सोडूनही टीका केली आहे. अशात राज ठाकरेंनी पुन्हा एकत्र येण्याचं भाष्य करुन टायमिंग साधलं आहे. हे दोन भाऊ एकत्र आले तर नक्कीच एक वेगळं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहण्यास मिळेल.
प्रकाश अकोलकर यांचं म्हणणं काय?
“शिवसेनेच्या सहा दशकांच्या कालखंडात बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच दोन ठाकरे सेना झाल्या. आता तीन झाल्या आहेत. दोन ठाकरे आहेत, तीन सेना आहेत आणि मराठी माणूस कुठे आहे? असा प्रश्न वारंवार विचारावासा वाटतो. गेल्या दहा वर्षांत जे राजकारण बदललं. भाजपा सत्तेवर आल्याने नाही तर मोदी आणि शाह यांच्याकडे सत्तेची सूत्रं गेल्याने ते बदललं असं मला वाटतं. मराठी माणसांचे प्रश्न निर्माण होणं, महाराष्ट्राचं राजकारण बदलणं हे सगळं मोदी आणि शाह यांच्या काळात घडलं आहे.” असं प्रकाश अकोलकर यांनी म्हटलं आहे.
तीन तासांच्या आत उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आहे-प्रकाश अकोलकर
“राज ठाकरेंनी साद घालणं आणि त्यानंतर तीन तासांच्या आत उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देणं याचा विचार करावा लागेल. कोणतेही दोन पक्ष जे गेली २० वर्षे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत ते जर एकत्र येणार असतील तर काहीतरी विशिष्ट मुद्दे त्यांना विचारात घ्यावेच लागतील. त्याला अटीही म्हणू शकता पण काहीतरी मुद्दे घेऊन तर चर्चेला बसावं लागेल. दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण होईल असं मला मुळीच वाटत नाही. मर्जर आत्ता करायचं असतं तर मग राज ठाकरे बाहेर का पडले हा प्रश्न आपोआप निर्माण होईल. शिवाय पक्ष एकमेकांमध्ये विलीन झाले तर अजून एक प्रश्न निर्माण होईल तो म्हणजे या पक्षाचा मुख्य सूत्रधार कोण? कुटुंब पक्ष जे जे आहेत त्यांच्याबाबतीत हे प्रश्न निर्माण होतात.” असंही प्रकाश अकोलकर यांनी म्हटलं आहे. बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिला. या दोघांमधली कोंडी फुटली याचं कारण असं आहे की २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले. उत्तर प्रदेशात त्यांनी ८० पैकी ७२ जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशातलं हे वैचारिक सत्तांतर झालं असं मला वाटतं. त्यामुळे भाजपाला हे कळलं की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आवश्यकता नाही. आपल्याला आपला हिंदूहृदय सम्राट मिळाला आहे. त्यामुळेच २०१४ ला त्यांनी युती तोडली होती.
राज ठाकरेंची मुलाखत टायमिंगवर समोर आली-प्रकाश अकोलकर
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाच पक्षांची लढाई झाली होती. राज ठाकरेंनी त्याच वेळी उद्धव ठाकरेंना साद घातली होती. अनेकांना त्यामुळे खूप आनंद झाला. मनसे आणि शिवसेना युती होईल अशी चर्चा जोरदार होती. पण त्यावेळी राज ठाकरेंची तयारी असताना उद्धव ठाकरेंनी ती युती होऊ दिली नाही. २०१७ लाही असंच घडलं. भाजपाने महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारुन दाखवली. त्यावेळीही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह जायचा प्रयत्न केला होता. पण उद्धव ठाकरेंनी २०१७ मध्ये नगरसेवक फोडले. त्यामुळे आत्ता प्रतिसाद दिला आहे त्याचं उत्तर असं आहे की, उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. टायमिंगवर मुलाखत समोर आली. मराठी माणसाच्या हितासाठी ते बोलले, आमच्यातली भांडणं क्षुल्लक आहे त्याचं टायमिंग हिंदी सक्तीचा मुद्दा समोर आलेला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लगेच प्रतिसाद दिला. दोन्ही ठाकरे बंधूंना कळलं आहे आपल्या संघटनांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. राज ठाकरेंची अवस्था ही कमालीची बिकट आहे. मुंबई महापालिकेची सत्ता जर शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना मिळाली नाही तर शिवसेनेतलं सगळं स्पिरिट संपुष्टात येईल. उद्धव ठाकरेंचा प्राण मुंबई महापालिकेत आहे. हा दोघांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाल्या आहेत. विधानसभेला जर ५० ते ६० जागा उद्धव ठाकरेंना मिळाल्या असत्या तर त्यांनी टाळीची हाळी दिली नसती. असंही प्रकाश अकोलकर यांनी म्हटलं आहे.
मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊ म्हणत आहेत हे खरंतर दुर्दैव-प्रकाश अकोलकर
उद्धव ठाकरेंनी बिगर मराठी माणसांची आणि विशेषतः मुस्लिमांची मतं विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घेतली. उद्धव ठाकरे यांची ही पण एक ताकद आहे असं म्हणता येईल. हिंदू मतं मोदी-शाह आणि फडणवीस खेचून घेणार असतील तर मुद्दा उरला तो मराठीचाच. ६० वर्षांनी म्हणजेच स्थापनेच्या वेळी जो मुद्दा समोर होता त्याच मुद्द्यावर ठाकरे बंधूंना एकत्र यायचं असं म्हणावं लागतंय, ही खरं तर ट्रॅजिडी आहे. असंही प्रकाश अकोलकर म्हणाले. राज ठाकरे बाहेर पडले कारण उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेची सूत्रं दिली. त्यांची कोंडी झाली वगैरे सगळा इतिहास झाला. उद्धव ठाकरेंना हे फार पूर्वीच कळलं होतं की मुंबईत राहायचं असेल तर फक्त मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा यावर जगता येणार नाही. त्यामुळे मी मुंबईकर ही घोषणाही दिली होती. मुंबईत जेव्हा रेल्वे भरती होती तेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या आधी उत्तर प्रदेशातील लोकांना मारहाण केली. त्यानंतर ते बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेने असं घोषवाक्य घेतलं की मराठी हा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे. सोयीस्करपणे कुठला प्राण आणि कुठला श्वास ते त्यांना बदलता येऊ लागली. असंही प्रकाश अकोलकर म्हणाले. २०१९ नंतर भाजपाच्या बाजूने उद्धव ठाकरे एकही शब्द बोलले नाहीत. आता जो प्रतिसाद दिला आहे पण चर्चेला बसायचं असेल तर किती मुद्दे उपस्थित होतील याचा विचार केला तर उत्तरं मिळतील असंही प्रकाश अकोलकर यांनी म्हटलं आहे.