Raj Thackeray : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. प्रचाराचा धुरळा सुरु आहे. अशात राज ठाकरेंनी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात हे मी बोललो कारण एक उत्तम राजकीय समज त्यांच्यात आहे असं राज ठाकरे म्हणाले. तसंच लोकसभा निवडणुकीत भाजपाला का फटका बसला ते देखील राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

“या देशातल्या मुस्लिमांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व्होटर कार्डपासून सगळ्या गोष्टी सगळ्यांकडून भरुन घेतल्या. त्यांनी ते काम इतकं शांतपणे केलं. त्यानंतर एक गठ्ठा मतदान या सगळ्यांनी मोदी-शाह यांच्याविरोधात काँग्रेसला केलं. इंडिया आघाडीला केलं. त्याचवेळी भाजपाचा एक उमेदवार अयोध्येत पचकला, की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं होतं पायावर कुऱ्हाड नाही मारली, कोपऱ्यात असलेल्या कुऱ्हाडीवर पाय मारला. त्यानंतर ते नरेटिव्ह पसरत गेलं. या दोन्ही गोष्टींचा मेजर फटका भाजपाला बसला.” असं राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) म्हटलं आहे.

फोडाफोडी झाली ती मान्य पण पक्ष आणि चिन्हच देऊन टाकणं हे काही योग्य नाही

शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय किंवा कुठलाही पक्ष फुटल्यानंतर तो अख्खा पक्ष आणि चिन्हच दिलं जातं. ही बाब कुणाच्याही बाबतीत होऊ नये. महाराष्ट्रात साधारण २० ते २५ वर्षांपूर्वी सकस राजकारण असायचं. या फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनी १९७८ ला केली. त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला, त्यानंतर शिवसेना दोनदा फोडली. मग एकनाथ शिंदे, अजित पवार बाहेर पडले. चला फोडाफोडी झाली, पण नाव आणि चिन्ह जायला लागलं हे तर होत नव्हतं कधीच. राजकारणात मॉरल नावाची काही गोष्टच उरलेली नाही. आत्तापर्यंत फुटलेले लोक मर्ज झाले. कुणाच्याबाबतीत हे घडावं हे मला पटत नाही. बाकी काय राजकीय खेळ खेळा. भाजपा जबाबदार आहेच. मी कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत. फोडाफोडी केली नाही, दुसऱ्या पक्षांतही गेलो नाही कारण मला ती गोष्ट पटली नाही असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

अनेक कारणं होती ज्याचा राग लोकांच्या मनात राहिला होता

१९७७ ला आणीबाणी लागली होती. त्यावेळी ते एक कारण होतं. मात्र या लोकसभा निवडणुकीत एक म्हणावं असंही काही कारण नव्हतं. महापालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत हा रागही लोकांच्या मनात होता. वेगवेगळी कारणं होती जी साचली होती, त्याचा राग निघाला. असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले. राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) मुंबई तक या चॅनलला मुलाखत दिली त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.

राज ठाकरेंचा सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?

राज ठाकरेंचा सत्तेत जाण्याचा फॉर्म्युला काय? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही. यावेळी अनेक गोष्टींची सरप्राईजेस मिळतील. काय सरप्राईज ते आत्ता कसं सांगायचं? किंगमेकर वगैरे विषय फाल्तू आहे. एकदम बालिश विषय आहेत.” असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे माझं भाकीत आहे

भाजपाचं सरकार येईल, युतीचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील हे माझं भाकीत आहे. ही काही माझी आवड नाही. युती निवडणूक लढवते आहे त्यात कुणाला मुख्यमंत्री हा प्रश्न त्यांच्या पक्षांचा आहे. तरीही माझ्या पाठिंब्याशिवाय सरकार बसू शकणार नाही हे निश्चित आहे. माझ्या तसा जवळचा पक्ष हा भाजपा आहे. शिवसेनेत असल्यापासून दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर राजकीय संबंध आला असेल तर तो भाजपासह आला. बाळासाहेब ठाकरेंमुळे तो आला, आडवाणींशी माझा संवाद होता. अटल बिहारी वाजपेयी माझ्या घरी आले होते. माझा तसा राजकीय संबंध काँग्रेस, राष्ट्रवादीशी तसा संबंध आला नाही असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं कौतुक

देवेंद्र फडणवीस यांचं नाव मी घेतलं कारण विषयांची समज, महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दलचं आकलन हे सगळं देवेंद्र फडणवीसांकडे चांगलं आहे. एकनाथ शिंदे दिलदार माणूस आहे. मी मध्यंतरी एक विषय घेऊन गेलो होतो. पुण्यात पूर आला त्यावेळी दोन मुलं शॉक लागून गेली. मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी एक मिनिटही विचार केला नाही प्रत्येकी १० लाखांचा चेक कुटुंबांना मदत म्हणून दिला. अशी माणसं राजकारणात लागतात. सढळ हस्ते मदत करणारी, अडचणी दूर करणारी माणसं लागतात. आता त्यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित चाललं आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray answer on question what is the formula to go to power what did he say scj