Raj Thackeray ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं कुटुंब आहे ज्याकडे एक राजकीय ब्रांड म्हणून पाहिलं जातं. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष स्थापन केला आणि वाढवला. त्यानंतर राज ठाकरे यांच्या हाती सूत्रं दिली जातील असं वाटलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी त्याआधीच राजकीय आयुष्यात प्रवेश केला. ज्यानंतर शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरेंकडे आली. राज ठाकरेंनी डिसेंबर २००५ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर ९ मार्च २००६ रोजी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला.

२० वर्षांनी पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्माण झाल्यानंतर म्हणजेच २००६ नंतर राज ठाकरेंचा करीश्मा चांगलाच वाढलेला दिसून आला. २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यानंतर मात्र मनसेला उतरती कळा लागली. मागच्या २० वर्षांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा काही वेळा झाल्या पण हे दोन्ही बंधू एकत्र आले नाहीत. आता ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता आहे. याचं कारण राज ठाकरेंचं वक्तव्य आणि त्यांना उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद या दोन्ही गोष्टी ठाकरे बंधू एकत्र येतील का? या चर्चेला कारण ठरल्या आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरेंशी काय संवाद झाला होता ते सविस्तर सांगितलं आहे.

शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरेंशी काय चर्चा झाली? काय म्हणाले राज ठाकरे?

शिवसेना सोडताना माझी आणि बाळासाहेब ठाकरेंची फारशी चर्चा झाली नाही. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना मी शिवसेनेत राहणार नाही याचा अंदाज आला होता. मी उठलो त्यावेळी बाळासाहेबांनी दोन्ही हात पसरले आणि मला मिठी मारली. मग म्हणाले जा. मी बाळासाहेबांना सांगून शिवसेना या पक्षातून बाहेर पडलो, मी काही गद्दारी केली नाही. मी माणसं फोडूनही गेलो नाही. नवीन पक्ष काढणं वगैरे माझ्या डोक्यातही नव्हतं. मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा सगळे लोक माझ्या घराबाहेर आले वगैरे ते सगळं झालं. त्यानंतर मला कुणीतरी सांगितलं तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करा. मी दौरा काढला. त्यावेळी मला अनेकजण म्हणाले की तुम्ही पक्ष काढला पाहिजे. ही गोष्ट जानेवारी २००६ ची वगैरे गोष्ट असेल. कारण ते सोपं नव्हतं. बाळासाहेब हयात असताना मी माझा पक्ष काढला आहे. नाव काय ठेवायचं, झेंडा काय घ्यायचा? मग एक दिवस ठरवलं की पक्ष काढायचा. महेश मांजरेकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत राज ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे.

Shivsena Symbol
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली?

शिवसेना सोडणं काहीसं विचित्र होतं-राज ठाकरे

बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील हे दोघंही सख्खे भाऊ. आई आणि माँ या दोघी सख्ख्या बहिणी त्यामुळे शिवसेना सोडणं विचित्र होतं. भुजबळ, राणे, शिंदे गेले तसा विषय नव्हता. आम्हाला घरातूनही बाहेर पडायचं होतं. घरातून बाहेर पडणं आणि असणंही होतं अशा खूप गोष्टी होत्या. बाळासाहेब असताना ते घर होतं. महाराष्ट्र माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, मराठी माणूस महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या सगळ्यासमोर कुठलीही भांडणं किंवा वाद या गोष्टी दुय्यम, तिय्यम गोष्टी आहेत. असंही राज ठाकरे म्हणाले.