Raj Thackeray महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने झाले आहेत. त्यानंतर मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निकाल लागल्यानंतर सगळीकडे सन्नाटा होता. शिवाय कुणलाही कळलं नाही असं कसं काय झालं? असं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर ज्या अजित पवारांचा एक खासदा निवडून आला होता त्यांचे ४२ आमदार कसे निवडून आले? लोकसभेनंतर चार महिन्यांत लोकांचं मत इतकं कसं बदललं असाही सवाल राज ठाकरेंनी केला आहे. तसंच बाळासाहेब थोरात सात वेळा निवडून आले होते ते कसे काय पडले? असा प्रश्न विचारत निकालाबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर माझ्याकडे संघाशी संबंधित एक गृहस्थ आले होते. मला त्यांनी एक वाक्य सांगितलं. मला म्हणाले इतना सन्नाटा क्यूँ है भाई? कोई तो जिता होगा. निकालानंतर महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला ते कसलं द्योतक आहे? आमचे राजू पाटील आज इथे बसले आहेत. त्यांचं एक गाव आहे तिथे त्यांनाच मतदान होतं. १४०० लोकांचं गाव आहे ते. या गावात राजू पाटील यांना किती मतं मिळाली असतील? एक पण नाही. कसं काय शक्य आहे? संपूर्ण गावातलं एकही मत मिळालं नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

जे निवडून आलेत त्यांचाही विश्वास नाही कसे निवडून आलो-राज ठाकरे

मराठवाड्यातला आपला एक पदाधिकारी आहे तो नगरसेवक आहे. तो नगरसेवक असताना त्याला साडेपाच हजारांचं मतदान त्याच्या भागातून आहे. यावेळी विधानसभेला उभा असताना त्याला किती मतदान झालं? अडीच हजार मतं. अनेक असे निर्णय आहेत ज्यावर विश्वास बसतच नाही. निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, पडलेल्यांचं काय घेऊन बसलोय आपण? निवडून आलेले रोज रात्री बायकोला सांगतात चिमटा काढ म्हणून. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले. ते सातवेळा ७० ते ८० हजार मताधिक्यांनी निवडून यायचे त्यांचा १० हजार मतांनी पराभव झाला. कदाचित अनेक लोक बोलतील राज ठाकरे पराभूत झाल्याने हे बोलत आहेत, मी नाही संपूर्ण महाराष्ट्र बोलतो आहे. जे निवडून आले आणि सत्तेत आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांनाही शॉक बसला आहे.

अजित पवारांना ४२ जागा? कुणाचा विश्वास बसेल यावर?-राज ठाकरे

भाजपाला १३२ जागा मिळाल्या चला ठीक आहे. २०१४ ला त्यांना १२२ जागा मिळाल्या होत्या, नंतर १०५ आल्या, आता १३२ आल्या समजू शकतो. अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले? त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का? असं सगळ्यांना वाटत होतं. कुणाचा तरी विश्वास बसेल का? जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत, ज्यांच्या जिवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना १० जागा? न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. चार वेळा लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे यावेळी फक्त १५ आमदार निवडून आले. लोकसभेला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवारांचे ४२ आमदार आले? काय झालं, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. मी तुम्हाला सांगायला आलो आहे की मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, ते आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते गायब झालं. अशा प्रकारे निवडणूक लढवायची असेल तर कशाला निवडणूक लढवायची? ही गोष्टही निघून जाईल, कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.