Raj Thackeray : “शरद पवार फोडाफोडीच्या गोष्टी कशा करतात? ज्यांनी…”, राज ठाकरेंची तिखट शब्दांत टीका

राज ठाकरेंनी नेस्को मैदानावर मनसेचा मेळावा घेतला, त्या मेळाव्यात त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.

What Raj Thackeray Said About Sharad Pawar?
राज ठाकरेंनी शरद पवारांबाबत काय म्हटलं आहे? (फोटो-राज ठाकरे फेसबुक पेज, शरद पवार फेसबुक पेज)

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शरद पवार, उद्धव ठाकरे, भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या सगळ्यांचा समाचार आपल्या भाषणातून घेतला. शरद पवार म्हणतात माझा पक्ष फोडला. ते कशा काय फोडाफोडीच्या गोष्टी करतात? असा खोचक प्रश्न राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) विचारला. आज राज ठाकरेंनी मुंबईतल्या नेस्को मैदानावर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका केली.

प्रामाणिक उद्योजक चालतात मग राजकारणी का नकोत?

रतन टाटा यांचा आणि माझा खूप चांगला स्नेह होता. त्यांच्या निधनाने मलाही खूप दुःख झालं. मी लोकांच्या प्रतिक्रिया वाचतो आहे लोक म्हणत आहेत, सरळ, साधा आणि सज्जन माणूस होता. जर लोकांना रतन टाटांसारखा सरळ, साधा आणि सज्जन माणूस उद्योजक म्हणून आवडतो तर तुम्हाला सरळ, साधा आणि सज्जन राजकारणी का नको? प्रत्येक वेळी तुम्ही गद्दारांना कसं काय निवडून देता? खासदार, आमदार फोडायचे. एकाबरोबर निवडणूक लढवायची, मग निवडून आल्यावर विचारांशी प्रतारणा करुन दुसऱ्या पक्षांबरोबर जायचं आणि सत्तेत यायचं हेच मागची पाच वर्षे चाललं आहे. नेमकं तुम्हाला आवडतंय का? सरळ, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस पाहिजे की फोडाफोडी करणारे हवेत ते ठरवा असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

Raj Thackeray : “उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत, सारखं अब्दाली आला, अफझल खान आला, अरे..”; राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

काय म्हणाले राज ठाकरे?

शरद पवार सांगत आहेत आमचा पक्ष फोडला. मला हे काही कळलंच नाही. तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस पक्ष फोडला, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर राणेंना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी करत आहेत? अजित पवारांबाबत मी बोललोच होतो. इतके दिवस ओरडत होते आता गुलाबी जॅकेट्स घालून फिरत आहेत. भाजपा या लोकांना स्वीकारतो कसा काय? अजित पवार भाजपात येण्याच्या आठ दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकू. तुरुंगात टाकण्याऐवजी त्यांना मंत्रिमंडळात कसं काय टाकलं? हे सगळं का होतं आहे? कारण तुम्हाला गृहीत धरलं आहे. तुम्ही कोण आहात? मिंधे, लाचार सगळी जनता. पैसे फेकून तुमच्याकडून मतं घेऊन जाऊ, मग वाट्टेल तसं वागू, पैसे ओरबाडू अशी वृत्ती आहे असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

महाराष्ट्राची अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती

आज राज्यातल्या जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद होणार हे विसरु नका. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती, असंही राज ठाकरे म्हणाले. काही निष्ठा वगैरे प्रकार आहे की नाही? महाराष्ट्राची अवस्था खूप वाईट झाली आहे. असंही राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray ask sharad pawar how can he say his party split he did only such thing for lifetime scj

First published on: 13-10-2024 at 16:26 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments