औरंगाबादमध्ये झालेल्या सभेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात आता राज ठाकरेंची आणि मनसेची पुढील पावलं काय असणार आहेत? यावरून चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर बाहेर आलेले मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या संपूर्ण प्रकाराविषयी सूचक विधान केलं आहे. या सभेसंदर्भात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसेच्या एकूण १५ हजार पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्याचं ते म्हणाले. मात्र, या नोटिसा पाठवल्या, म्हणजे आमच्यावर कारवाई केली असा त्याचा अर्थ होत नाही, असं देखील किल्लेदार यांनी सांगितलं आहे.
“पोलिसांनी त्यांचं काम केलंय, आम्ही आमचं करू”
“राज ठाकरेंवर गुन्हा जरी दाखल झालेला असला, तरी शिवतीर्थवर नेहमीसारखंच वातावरण आहे. आमच्या १५ हजार पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करू. नोटिसा बजावल्या म्हणजे त्यांनी आमच्यावर कारवाई केली असा अर्थ होत नाही”, असं यशवंत किल्लेदार म्हणाले आहेत.
अटकपूर्व जामिनासाठी राज ठाकरे औरंगाबादला जाणार?
दरम्यान, गुन्हा औरंगाबादमध्ये दाखल झाल्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी राज ठाकरे औरंगाबादला जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात बोलताना यशवंत किल्लेदार यांनी “कायदेतज्ज्ञांशी बोलून अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबादला जायचं की नाही यासंदर्भात राज ठाकरे निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय असेल ते…”
राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल असताना १५ हजार पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अटक केली, तर काय करणार? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारताच यशवंत किल्लेदार यांनी सहकार्य करण्याची भूमिका मांडली. “पोलिसांनी जर अटक केली, तर आम्ही त्यांना सहयोग करू. नेहमी जसं सहकार्य करतो, तसंच सहकार्य करू”, असं ते म्हणाले. मात्र हे सांगतानाच, “कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय असेल, हे तुम्हाला आत्ताच कसं सांगू? मलाच त्याची कल्पना नाही”, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.