अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींन वेग आला आहे. शिंदे गट-भाजपाकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला ही निवडणूक न लढण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. याच पत्रावर आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी भाजपा पक्ष चालवत नाही, मी फक्त विनंती करू शकतो. त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला तर एक चांगला संदेश जाईल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. ते आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
हेही वाचा >>> “इतका घाणेरडा महाराष्ट्र आजपर्यंत मी पाहिलेला नाही,” राज ठाकरे संतापले; म्हणाले “आमच्या माणसांनी…”
रमेश लटके यांच्या पत्नी निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. लगेच २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. साधारण वर्षभरासाठी ही आमदारकी असेल. याच कारणामुळे मी देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने निवडणूक न लढवण्याची विनंती केली. सध्या जे चित्र उभे आहे, त्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातून एक चांगला संदेश जाईल. राजकारणात पुढे येणाऱ्या तसेच सध्या राजकारणात असलेल्या लोकांना महाराष्ट्राची ही संस्कृती या निमित्ताने कळेल, असे राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>> राज ठाकरेंची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांवर आणणार तीन भागांचा चित्रपट
भाजपा हा एक वेगळा पक्ष आहे. तो पक्ष मी चालवत नाही. मी फार तर विनंती करू शकतो. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्यापर्यंतच हा विषय मर्यादित होता. यापलीकडे मी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. त्यात माझा संबंधही नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी सल्ला देऊ शकत नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> तुमचं खरं नाव स्वरराज, मग आता केवळ राज नाव का? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले…
विरोधकांना काय विचार करायचा ते करू देत. एखाद्याला कावीळ आजार झाला असेल, तर त्याला सगळे जग पिवळे दिसते. मी स्वच्छ मनाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. स्वीकारायच्या असतील तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या. या निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा करत नाहीये, असे म्हणत राज यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले आहे.