कोकणातील मराठी माणसाने पर्यटनसोडून इतर कोणत्याही उद्योगांसाठी आपल्या जमिनी विकू नयेत. जमीन विकायचीच असेल, तर त्या उद्योगात तुमची भागीदारी करा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी कोकणवासियांना दिला. आज कुठल्याही निवडणुका नाहीत. मी कोणालाही भडकवायला आलेलो नाही. पण सत्ताधाऱयांना घरी बसवत नाहीत, तोपर्यंत ते सुधारणार नाहीत, असे सांगत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर प्रहार केला.
महाराष्ट्राच्या दौऱयावर असलेल्या राज ठाकरे यांची दुसरी जाहीर सभा शुक्रवारी संध्याकाळी खेडमध्ये झाली. या सभेमध्ये शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. राज ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन उपरकर यांचे पक्षात स्वागत केले. कोल्हापूरप्रमाणे खेडमधील सभेलाही मोठी गर्दी होती.
कोकणातील जमिनीचे सात-बारे अमराठी माणसांच्या नावावर केले जाताहेत. या सगळ्यात दलाली करणारे मध्यस्थ मराठीच आहेत. त्यांना हे कळत नाही की आपल्या जागाच हातातून गेल्या, तर काय अस्तित्त्व राहणार आपले, याबद्दल खेद व्यक्त करीत राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक याप्रमाणे कोकणही पोखरून टाकले जात असल्याचा आरोप सत्ताधाऱयांवर केला.
जैतापूर प्रकल्प चांगला नसेल, तरच परतावून लावा
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला. रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला. मात्र, किती पर्यटन उद्योग सिंधुदुर्गात आले, किती फलोत्पादन प्रकल्प रत्नागिरीत आले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. त्याचवेळी कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प किती येताहेत. त्यामुळे किती प्रदूषण होते आहे, याकडेही लक्ष वेधले. अणुऊर्जा प्रकल्प खरचं चांगला नसेल, तर त्याला जरूर विरोध करा. मात्र, कोणीतरी राजकारण करून हा प्रकल्प परतावून लावणार असेल, तर तसे होऊ देऊ नका, असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर हल्ला केला. मुंबईतील चेंबूरमध्ये भाभा अणु संशोधन प्रकल्प आहे. ७० टक्के मुंबईकरांना या प्रकल्पात काय चालते, हे माहितीदेखील नाही. उद्या जर मुंबईत भूकंप झाला आणि या प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाला, तर किती लोकं मरतील. पण एवढाचं विचार करून अणुप्रकल्प परतावून लावणे योग्य नाही. जगात आज शेकडो अणुऊर्जा प्रकल्प आहेत. शिवाय सुनामी ही काही एखादे गाव ठरवून येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नारायण राणेंवर प्रहार
पत्रकार शैलेश माळोदे यांनी एका शिष्यवृत्तीसाठी कोकणाचा अभ्यास करून सादर केलेल्या प्रबंधामध्ये मालवणमधील जमिनी कशा विकल्या जाताहेत, याबद्दल आपला अनुभव लिहिला आहे. त्यांच्या अनुभवांबद्दल नारायण राणे यांनी खुलासा केलाच पाहिजे, असा प्रहार राज ठाकरे यांनी केला.
नक्कल करायलाही अक्कल लागते
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. नकला करून राज्य चालत नाही, या अजित पवारांच्या वाक्याचा समाचार घेताना राज ठाकरे यांनी नकला करायलाही अक्कल लागते सांगत त्यांचा चेहरा कायम गंभीर असल्याची खिल्ली उडवली.
… तर रायगडला धोका
रायगडावरील टकमक टोकापासून खालील बाजूस ३०० फुटांवर धरण बांधण्याचे काम सुरू आहे. तिथे भूसुरुंग स्फोट घडविले जाताहेत. त्यामुळे रायगडाला धोका आहे. तेथील कंपनी त्याबद्दल कोणतीही माहिती देत नाही. राज्य सरकारने याबद्दल खुलासा केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2013 रोजी प्रकाशित
घरी बसवल्याशिवाय सत्ताधारी सुधारणार नाहीत – राज ठाकरेंचा ‘प्रहार’
आज कुठल्याही निवडणुका नाहीत. मी कोणालाही भडकवायला आलेलो नाही. पण सत्ताधाऱयांना घरी बसवत नाहीत, तोपर्यंत ते सुधारणार नाहीत, असे सांगत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर प्रहार केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-02-2013 at 08:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray criticized ruling government in maharashtra