महाराष्ट्रात टोलच्या मुद्द्यावरून वेळोवेळी राजकीय दावे-प्रतिदावे, आरोप होताना पाहायला मिळतात. आत्तापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या सरकारमध्ये टोलमाफी किंवा टोलमुक्तीचा मुद्दा चर्चेलाही आला. मात्र, त्यावर अंतिम निर्णय काही अद्याप होऊ शकलेला नाही. मनसेकडून टोलच्या बाबतीत आक्रमक स्वरुपात आंदोलन करण्यात आलं. अगदी हल्लीच मुलुंडसह मुंबई एंट्री पॉइंटवरील टोलवाढीविरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यावरून राज ठाकरेंनी सर्व टोलनाके जाळून टाकण्याचाही इशारा दिला होता.
आज मुंबईत मंत्री दादा भुसे यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या त्या विधानाचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मंत्री दादा भुसेंना स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावं लागलं.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
एंट्री पॉइंटवरील टोलवाढीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव व इतर पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. राज ठाकरेंनी तिथे जाऊन त्यांची समजूत काढली. मात्र, त्याचदिवशी दुसरीकडे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी टोलसंदर्भात एक विधान केलं. “राज्यातील सर्व टोलनाक्यांवर चारचाकी व छोट्या गाड्यांना टोलमधून मुक्त केलं असून फक्त व्यावसायिक वाहनांवरच टोल आकारला जात आहे. राज्य सरकारकडून यासाठीचा निधी देण्यात आला आहे”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला.
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका जाहीर केली. “मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात मी चर्चा करेन. त्यानंतरही त्यावर निश्चित भूमिका घेण्यात आली नाही, तर मनसे महाराष्ट्रातले टोलनाके जाळून टाकेल. मग सरकारला जे करायचंय ते करू देत”, असं राज ठाकरे म्हणाले.
सह्याद्रीवरील बैठक आणि महत्त्वाचे निर्णय
दरम्यान, यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत राज्य सराकरकडून मनसेला टोलसंदर्भात काही आश्वासनं व काही निर्णय देण्यात आले आहेत. त्यानुसार, सर्व टोलनाक्यांवर एकूण खर्च-वसुली-शिल्लक यासंदर्भात डिजिटल बोर्ड लावणे, करारानुसार सोयीसुविधा देणे, उड्डाणपुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणे, पिवळ्या रेषेचा नियम पुन्हा लागू करणे, अवजड वाहने शिस्तीत टोलवरून सोडणे अशा काही मुद्द्यांचा समावेश आहे.
दरम्यान, यावेळी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना फडणवीसांच्या वक्तव्यासंदर्भात विचारणा केली असता त्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. “माझ्यासाठीही तो धक्काच होता”, असं राज ठाकरे म्हणाले. त्यापाठोपाठ त्यांच्याशेजारी बसलेले मंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेत देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.
दादा भुसेंचं फडणवीसांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण
“मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कदाचित त्यांच्या तोंडून तो शब्द निघाला असेल. पण राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्क्रीनवर देवेंद्र फडणवीसांची पूर्वीची मुलाखत दाखवली. त्यात त्यांनी स्पष्टपणे हेही सांगितलंय की मुंबईचे एंट्री पॉइंट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे यासाठी समिती नेमली आहे. त्या काळात ५०-६० ठिकाणी लाईट मोटर व्हेईकल्सला टोलमधून सूट देण्याचा निर्णय झाला होता. एमएसआरडीसीच्या काही टोलवर एलएमव्ही गाड्यांना सूट आहे, काही ठिकाणी टोल घेतला जातो ही वस्तुस्थिती आहे”, असं दादा भुसे म्हणाले.