महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको, फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तर महाविकास आघाडीने राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षातून धक्के बसू लागले आहेत. राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय आहे असं म्हणत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. एक मोठी फेसबूक पोस्ट करत कीर्तिकुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कीर्तिकुमार शिंदेंपाठोपाठ डोंबिवलीतही मनसेला धक्का बसला आहे. डोंबिवलीमधील मनसेच्या सात शिलेदारांनी पक्षाला रामराम केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते यांच्यासह इतर सात जणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा देत आहे असं मिहिर दवते यांनी म्हटलं आहे. मनसेच्या समाज माध्यमांवरील एका समुहात (या समुहात मनसेचे इतर वरिष्ठ पदाधिकारीदेखील आहेत) दवते यांनी त्यांचा राजीनामा शेअर केला आहे.
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवल्यानंतर एकीकडे काही मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. तर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. डोंबिवलीतील मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहिर दवते यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. दवते यांनी सांगितलं की, मनसेच्या सोशल मिडिया पेजवर मी राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळेच मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
हे ही वाचा >> ”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
किर्तीकुमार शिंदेंचा मनसेला जय महाराष्ट्र!
किर्तीकुमार शिंदेंनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अलविदा मनसे! महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…” अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं.