मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेवरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर तोफ डागली. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. यावेळी भाषणात बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

“…म्हणून भाजपावर टीका केली नाही”

याआधी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी भाजपावर टीका न केल्याबद्दल त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत होता. यासंदर्भात बोलताना राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. “मला तेव्हा मोदींच्या काही भूमिका नाही पटल्या. तेव्हा मी उघडपणे बोललो. आता हे म्हणतायत, मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला. मला नाही गरज ट्रॅक बदलायची”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

“गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे तारे तोडले, ते पाहिल्यावर मला वाटलं याचं उत्तर तर दिलं पाहिजे. पण मला पत्रकार परिषदेत याचं उत्तर द्यायचं नव्हतं. कारण मी जर पत्रकार परिषद घेतली असती तर या सगळ्या पक्षांना बांधील जे पत्रकार आहेत, तेही त्यात शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहून हे भलतीकडेच विषय भरकटवतात”, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

“शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसाने…”, राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा!

“माझं आजही मोदींना सांगणं आहे की…”

दरम्यान, यावेळी बोलताना भाषणात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन मागण्या केल्या असून त्या पूर्ण कराव्यात अशी विनंती देखील केली आहे. “आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला आसूया नाही की आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाच-पाच. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, हा देश एक दिवस फुटेल. या काही गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

Story img Loader