जालन्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सहाव्या दिवशी उपोषण सुरु आहे. आज ( ३ सप्टेंबर ) मनसे नेते बाळा नांदगावर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या लढाईत आम्ही तुमच्याबरोबर असल्याचा शब्द राज ठाकरेंनी जरांगे-पाटलांना दिला, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
“स्वातंत्र्यपूर्वकाळात मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण होतं, तर आता का नाही? मराठ्यांनी असं कोणतं पाप केलंय की आरक्षण दिलं जात नाही? निजामशाहीत मराठ्यांना आरक्षण होतं. मग, आता आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे,” अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी सरकारकडे केली.
हेही वाचा : “‘इंडिया’ ही अनैतिक आघाडी”, प्रफुल्ल पटेल यांच्या विधानावर काँग्रेस नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…
“शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या उपोषकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला, गोळीबार करणं हे कोणत्या कायद्यात बसतं? लाखोंचे मोर्चे काढून मराठा समाजाने जगाला आदर्श घालून दिला आहे. लाखोंच्या मोर्चात हिंसक वळण लागलं नाही? मग, इथे काय घडलं? पोलीस सांगतात आमच्यावर हल्ले झाले. आंदोलक काय दगड, धोंडे घेऊन बसलेले का?” असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : “जालन्यात मराठा आंदोलकरांवरील लाठीचार्जच्या घटनेला पोलीस नाहीतर…”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
“मराठा आंदोलकांवर हल्ला करण्यात आलेल्या पोलिसांच्या प्रमुखाची बदली न करता निलंबित केलं पाहिजे. लाठीहल्ला करून, गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, पोलिसांऐवजी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले,” असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.