महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस खळबळ उडवून देणार आहे. पहाटेच्या शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राजभवनाथ दाखल झाले होते. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ट्वीट करत राज ठाकरे म्हणाले, “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!.”

हेही वाचा : अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “जे घडले ते…”

“बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे. ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?” असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Story img Loader