विदर्भातील वाघाच्या शिकार प्रकरणांनी व्यथित होऊन एक वर्षांपूर्वी या मुद्यावर भरपूर घोषणा करणारे राज ठाकरे हा मुद्दा विसरले तर नाहीत ना? अशी शंका आता त्यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर पर्यावरणवाद्यांमध्ये सुरू झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या बफरझोनच्या जंगलात वाघांच्या शिकारीची प्रकरणे गाजू लागली होती. ठराविक अंतराने वाघाचे मृत्यू व शिकारीची प्रकरणे उघडकीस येत असल्याने संपूर्ण देशभरातील वन्यजीवप्रेमी अस्वस्थ झाले होते. या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात ताडोबाचा दौरा केला होता. सलग दोन दिवस ते ताडोबा परिसरात होते. तेव्हा त्यांनी येथे व नागपुरात वाघांच्या शिकार प्रकरणांवरून सरकारला तसेच वनमंत्री पतंगराव कदम यांना अक्षरश: धारेवर धरले होते. जंगलातील गावात राहणारे गावकरी या शिकारीत का सहभागी होतात, त्याची कारणे काय, अशा सर्व पैलूंवर आपण अभ्यास करू असेही त्यांनी जाहीर केले होते. या शिकारीच्या प्रकरणात आरोपींचा सुगावा देणाऱ्याला मनसेतर्फे ५ लाखाचे बक्षीस त्यांनी जाहीर केले होते.
वनमंत्र्यांवर टीका करीत असलो तरी मुंबईला परतल्यावर त्यांची भेट घेऊन वाघांच्या संवर्धनासाठी काही निश्चित उपाययोजना करता येतील काय यावर विचारविनिमय करू, असेही त्यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात यातील एकही घोषणा ठाकरे यांनी पाळली नाही. गेल्या वर्षी झालेल्या वाघांच्या शिकार प्रकरणातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस व वनखात्याला यश आले. मात्र, राज ठाकरे यांनी जाहीर केलेली बक्षिसांची रक्कम मिळावी यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. गेल्या वर्षीचा मे मधला दौरा आटोपल्यानंतर स्वत: राज ठाकरेसुद्धा व्याघ्र संवर्धनाच्या मुद्यावर कुठे बोलताना दिसले नाहीत. त्यामुळे ठाकरेंनी वाघांना वाऱ्यावर तर सोडले नाही ना, अशी शंका आता वन्यजीवप्रेमींच्या वर्तुळात घेतली जात आहे.
गेल्या वर्षी येथील दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी मायलेज मिळवण्यासाठी हा दौरा केलेला नाही, तर एक वन्यजीवप्रेमी म्हणून वाघांविषयी आस्था असल्यामुळे दौऱ्यावर आलो असे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याने वन्यजीवप्रेमींचे वर्तुळ तेव्हा आनंदित झाले होते.
नंतर वर्षभरात मात्र त्यांनी या मुद्यावर काहीच केल्याचे दिसले नाही, म्हणून आता हेच वर्तुळ नाराज झाले आहे. मनसेच्या या वाघाने येथील वाघांची कायम काळजी घेत राहावी, अशीही अपेक्षा या प्रेमींच्या वर्तुळात आता व्यक्त होत आहे.
आपल्याच घोषणांचा राज ठाकरे यांना विसर
विदर्भातील वाघाच्या शिकार प्रकरणांनी व्यथित होऊन एक वर्षांपूर्वी या मुद्यावर भरपूर घोषणा करणारे राज ठाकरे हा मुद्दा विसरले तर नाहीत ना? अशी शंका आता त्यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर पर्यावरणवाद्यांमध्ये सुरू झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या बफरझोनच्या जंगलात वाघांच्या शिकारीची प्रकरणे गाजू लागली होती.
First published on: 16-03-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray forget his commitment over tiger hunting in vidarbha