Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर म्हणजे शिवतीर्थावर सभा आहे. आज आपल्या भाषणात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे काय भूमिका घेणार हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या भाषणात काय मुद्दे असण्याची शक्यता आहे ते आपण जाणून घ्या.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या टिझरमध्ये काय?
गुढीपाडवा मेळाव्याच्या टिझरमध्ये हिंदुत्व, पक्षाची पुढची भूमिका, औरंगजेबाची कबर, महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल, मनसेची पुढची भूमिका हे सगळे विषय आहेत. त्यामुळे या विषयांवर राज ठाकरे बोलणार यात तर शंकाच नाही. तसंच महापुरुषांचा अवमान प्रकरण, मराठी आणि इतर भाषिक वाद याबाबतही राज ठाकरे भाष्य करु शकतात.
कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टीचा राज ठाकरेंचा इशारा
राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी करणार असल्याचा इशारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या कामाचा लेखाजोखा तपासणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यासाठी संरचना करण्यात येत असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते. या संघटनात्मक गोष्टीचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजेत असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना मिळाव्यात सांगितले होते. आता मनसेची पुढची दिशा काय राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
वाघ्या कुत्र्याची समाधी आणि औरंगजेब समाधी यावर काय बोलणार राज ठाकरे?
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाच्या कबरीचा विषय महाराष्ट्रात गाजतो आहे. उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी केली आहे. तर हिंदुत्ववादी संघटनांनीही औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता. त्यावरुन राज ठाकरे काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं असणार आहे. तसंच वाघ्या कुत्र्याची समाधी कपोलकल्पित असल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे ती रायगडावरुन हटवण्याची मागणी केली आहे. त्यावरही राज ठाकरेंची भूमिका काय हे महाराष्ट्राला कळण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंबाबत काय बोलणार राज ठाकरे?
मनसेने गुढीपाडवा मेळाव्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता बाळासाहेबांच्या फोटोशिवाय कुणाला पुढे जाताच येत नाही असं म्हणत राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेलाही राज ठाकरे उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची घोषणा करणार का?
गुढीपाडवा मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. तसंच शिवाजी पार्क मैदानावर या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला यश मिळालं नाही. त्याबाबत राज ठाकरे पक्षाला कशी उभारी देतात काय भूमिका घेतात? महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करतात का? याकडेही महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.