Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्क मैदानावर जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन अजित पवारांवर टीका केली. तसंच विविध मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. नदी स्वच्छतेचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे ते अधोरेखित केलं. आपण जाणून घेऊ राज ठाकरेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

देशातील नदी स्वच्छता प्रश्नावर भाष्य

राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातल्या तीर्थाबाबत मागच्यावेळी झालेल्या भाषणात टीका केली होती. त्यावेळी त्यांनी कुंभमेळ्याला नावं ठेवली अशी टीका राज ठाकरेंवर झाली. यावर आज राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत नदी स्वच्छता किती आवश्यक आहे ते सांगितलं. देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. ज्याला आपण माता म्हणतो देवी म्हणतो त्या नद्यांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे असे राज ठाकरे म्हणाले. गंगा साफ करा असे प्रथम राजीव गांधी म्हणाले होते. तेव्हापासून गंगा साफ होत होते. पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये तेच सांगितलं आहे. नद्यांची अवस्था बिकट आहे. कुंभमेळ्यात लाखो लोक अंघोळ केल्यानंतर आजारी पडले आहेत. असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबईत पाच नद्या होत्या त्यातल्या चार मारल्या गेल्या आहेत-राज ठाकरे

धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सर्वांना आपापला धर्म प्रिय असतो, पण यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत असे राज ठाकरे म्हणाले. धर्माच्या गोष्टी मला सांगू नये कोणी असेही ठाकरे म्हणाले. मुंबईत पाच नद्या होत्या त्यातील चार नद्या मारल्या गेल्या आहेत. सांडपणी झोपडपट्यांमधून मारल्या गेल्या. आता मिठी नदी उरली आहे असे राज ठाकरे म्हणाले.

लाडकी बहीण योजना बंद होणार, राज ठाकरेंचा दावा

राज्य सरकारच्या महत्वकांक्षी लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकारवर या योजनेमुळं ६३ हजार कोटींचं कर्ज होईल असे राज ठाकरे म्हणाले. ही योजना बंद होणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. कर्ज काढून दिवाळी करायली सांगितली कोणी? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

औरंगजेबाच्या कबरीबाबत महत्त्वाचं भाष्य

औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिलसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. “आम्हा मराठ्यांनी संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथं गाडला गेला, हा आमचा इतिहास” असा मजकूर त्यावर लिहा.आम्ही कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या, असे राज ठाकरे म्हणाले. तिकडे लहान लहान मुलांच्या ट्रीप गेल्या पाहिजेत आणि त्यांना हा इतिहास दाखवला पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले.

चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत-राज ठाकरे

चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. विकी कौशल मेल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान समजलं का? असा सवाल करत राज ठाकरेंनी टीका केली. सध्या माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. इतिहासाच्या मुळाला गेला ना तुमच्या अपेक्षांची भांडी खळ्ळकन फुटतील असंही राज ठाकरे म्हणाले.

जातीपातीचं राजकारण होतंय, महाराष्ट्रातील माणसाने एकजूट होण्याची गरज

जातीपातीचं राजकारण केलं जातं आहे, त्यातून तरुणांची माथी भडकवली जात आहेत. या सगळ्यापासून वाचायचं असेल तर तु्म्ही सगळ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे. तसं घडलं तर सरकारही तुम्हाला उत्तरदायी असेल. हिंदू फक्त मुस्लिम रस्त्यावर उतरल्यानंतर हिंदू असतात. नंतर ब्राह्मण, मराठा, कुणबी, साळी, अशा जातींमध्ये विभागले जातात. असाही मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला.

जंगलतोड थांबवली गेली पाहिजे, अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी वापरणं आवश्यक

राज ठाकरे म्हणाले, सगळीकडे झाडं जगवा झाडे लावा असे बोर्ड लावले जातात. मात्र, दुसरीकडे हिंदुचे अंत्यसंस्कार लाकडावर होतात. जंगलतो़ड झाल्याशिवाय लाकूड येणार नाही. याला पर्याय म्हणून विद्युतदाहिन्या आल्या आहेत. देशभर विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत.

मराठा समाजाबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

“आजपर्यंत राज्याच्या राजकारणात सर्वात जास्त आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? मग काय केलं आमदारांनी. मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मागावे लागत असेल तर एवढे आमदार मंत्री मुख्यमंत्री का निवडून दिले? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा संताप

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केले. त्यांची खूप घाणेरड्या पद्धतीनं हत्या केली गेली. तुमच्या नसांनसात एवढी क्रूरता भरली असेल तर मी जागा दाखवेन तिथे जा असं राज ठाकरे म्हणाले. हे सगळं झालं कशातून? तिथे असणाऱ्या मिल, प्रकल्पातून निघणारी राख, मी आत्तापर्यंत असं ऐकलं होतं की राखेतून फिनिक्स पक्षी भरारी घेतो. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात झाले आहेत. खंडणी आणि पैशांचा सगळा विषय होता असंही ठाकरे म्हणाले.

कर्जमाफीचा मुद्दाही भाषणात उपस्थित

निवडणुकीच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं कर्जमाफी होणार. पण आता अजित पवार म्हणाले की ३० तारखेच्या आधी पैसे भरुन टाका. कर्जमाफी होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर हे नेते वाट्टेल ते बोलणार आणि निवडणुका झाल्या की म्हणतात पैसे भरा, असं राज ठाकरे म्हणाले. दिवसाला शेतकऱ्यांचा सात आत्महत्या होत आहेत. त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. मराठवाड्यातील असंख्य मुलं मुली पुण्याकडे येत आहेत. त्याकडे दुर्लक्ष होतं आहे असंही राज ठाकरे म्हणाले.