राज ठाकरेच हिंदुत्वाचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत कडवट हिंदुत्वाचे विचार मांडले गेले. मात्र आज त्यांच्या विचारांचा वारसा सांगणार जो पक्ष आहे त्या पक्षाच्या सभेला इमाम सांगतात की गर्दी करा. जे दुसरे आहेत त्यांच्या सभेत सगळं गुफ्तगू चाललं आहे. हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मींचे तेच कळत नाही असा टोलाही प्रकाश महाजन यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश महाजन?
“मी एकदा राज ठाकरेंना हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारला. तेव्हा मला राज ठाकरे मला म्हणाले ना मी हिंदुत्व कधी नाकारलं आहे? सध्या हिंदुत्वाचा वारसा सांगणारे बरेच जण आहेत. मात्र ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत हिंदुत्वाचे धगधगते विचार ऐकवले जायचे त्याच बाळासाहेबांच्या वारशाच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे तिथे कुराणाच्या आयता पठण केल्या जातात. तिथे मौलवी फतवे काढतात की यांच्या सभेला गर्दी करा. दुसरीकडे जो एक वर्ग म्हणतोय की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय त्यांच्या मिरवणकीत इलू इलू चाललं आहे. हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत, बाळासाहेबांचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे वारसदार आहेत हे काही कळायला मार्ग नाही.”
भाजपाचं हिंदुत्व कपड्यांसारखं सोयीनुसार बदलणारं आहे
राज ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाचं म्हणजेच मनसेचं हिंदुत्व हे शरीरावर चिकटलेल्या त्वचेसारखं आहे ते आमच्यापासून वेगळं करता येणार नाही. भाजपाचं हिंदुत्व सोयीनुसार आहे. कपड्यांसारखं आहे ते कधीही अंगावरून काढून खुंटीला टांगू शकतात. हिंदुत्वाचे खरे वारस जर उभ्या जगात असतील तर ते राज ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या कडवट हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरेच घेऊन जात आहेत. कारण हे आम्ही नाही आता लोकच म्हणू लागले आहेत. राज ठाकरेंनी कधीही बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीवर आपला अधिकार सांगितला नाही. त्यांनी आपलं काम केलं आणि लोकांनी ठरवलं की बाळासाहेबांच्या नंतर हिंदुत्वाचा वारस कोण होऊ शकतं तर राज ठाकरे होऊ शकतात” असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
शिंदे-फडणवीसांना आमची गरज लागू शकते
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची निवडणुकीच्या पूर्वीची युती होईल की नाही राज ठाकरेच सांगू शकतील. निवडणुकीच्या आधी युती करायची की नंतर युती करायची हा निर्णय राज ठाकरेच घेऊ शकतील. तसंच उद्या आमची गरज एकनाथ शिंदे यांच्या गटाला किंवा भाजपाला पडू शकते. त्यामुळेच राज ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.