विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी मराठवाड्यात आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुलाखतींदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने उर्वरित मुलाखती अर्धवट सोडून राज हॉटेलमध्ये परतले होते. दरम्यान, राज यांची प्रकृती खरंच बिघडली होती की इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर ‘अस्वस्थ’ वाटू लागले, याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 
गेले पाच-सहा दिवस मला ताप होता आणि आज दुपारी अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे आता फार काही बोलता येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी संध्याकाळी मुंबईच्या दिशेने रवाना होताना पत्रकारांना दिली. 
विधानसभेच्या मराठवाड्यातील ४६ जागांसाठी राज ठाकरे इच्छुकांच्या मुलाखती घेत होते. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास राज यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते जालना रोडवरील रामा हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी परतले. राज यांना गेले दोन-तीन दिवस सर्दी-खोकल्याचा त्रास होत आहे. परंतु, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती राज यांच्या खासगी सचिवाने दिली. राज ठाकरे हॉटेलवर गेल्यानंतर धुळे आणि नंदुरबार येथील उमेदवारांच्या मुलाखती मनसे आमदार बाळा नांदगावकर व मनसे नेते अभ्यंकर यांनी घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा