गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांमधल्या फुटीची. आधी शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. दोन वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार सत्ताधारी झाले. शिंदे गट व अजित पवार गटानं मूळ पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगानं निकाल त्यांच्या बाजूने दिला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १८ वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका फुटीसंदर्भात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे.
‘बोल भिड़ू’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी विविध राजकीय मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केलं. त्यात महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आणि पक्षफुटीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, कुटुंबांमध्ये होणारे आरोप-प्रत्यारोप यासंदर्भात विचारणा करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी मनसेच्या स्थापनेआधीची शिवसेनेतली परिस्थिती सांगितली.
“पक्ष सोडला तेव्हा ३२ आमदार, ६-७ खासदार सोबत होते”
शिवसेनेतून बाहेर पडताना अनेक आमदार-खासदार सोबत यायला तयार होते, असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. “मी पक्ष सोडला तेव्हा माझ्याकडे ३२ आमदार,६-७ खासदार आले होते. ते म्हणाले आपण एकत्र बाहेर पडू. पण मला पक्ष फोडून काहीच करायचं नव्हतं. जर माझा हेतू पक्षप्रमुख होण्याचा असता, तर मी त्या लोकांना पक्षफोडून बाहेर काढलं असतं. पण मला बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष यांना कोणत्याही प्रकारचा दगाफटका करायचा नव्हता. त्यामुळे मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. परस्पर बाहेरच्या बाहेर निर्णय घेतला वगैरे असं काहीही नव्हतं”, असं राज ठाकरे म्हणाले.
“तो बाळासाहेबांचा पक्ष आहे. पक्षाचं प्रमुख होणं हे माझ्या मनाला कधी शिवलंही नाही. तुम्ही कशावरही हात ठेवून मला हे बोलायला सांगा”, असं ते म्हणाले. “आज जे चाललंय ते भयानक चाललंय. मी बाहेर पडलो तेव्हा मी एक गोष्ट जाहीर केली होती की बाळासाहेबांनी माझ्यावर वाट्टेल त्या थराला जाऊन टीका केली तरी माझ्याकडून त्यावर उलट उत्तर येणार नाही”, असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? यावर आता तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
“नवं उभं करा, जुनं ओरबाडण्यात काय अर्थ आहे?”
“तुम्हाला जर एखादी गोष्ट पटली नाही, तर तुमची स्वत:ची उभी करा. दुसऱ्यांना ओरबाडण्यात अर्थ नाही. तिथे सर्वात जास्त नुकसान आहे. तुम्हाला नाही पटलं तर नाही पटलं. तुमची रेष तुम्ही आखा. आहे त्यात विष कालवण्यात, आहे ते ओरबाडण्यात काय अर्थ आहे?” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
वारसाहक्कासाठी अनेक लोक फक्त मालमत्तांचाच विचार करतात. संस्कार, गुण, कला हे जे काही मला मिळालं, हाच माझा वारसा आहे. पक्षाला मी वारसा समजत नाही. मला वाटतं विचारांचा वारसा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो फक्त वाचणं, ऐकणं नव्हे, तर त्यावर अंमलबजावणी करणं हेही महत्त्वाचं आहे.