मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. अशात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंना कर्णाची उपमा दिली आहे. राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यावर मी माझं मत मांडेन असं प्रकाश महाजन म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी आज राज ठाकरेंना कर्ण म्हटलं आहे. तसं सोशल मीडियावर राज ठाकरेंना जे ट्रोल केलं जातं आहे त्यावरही प्रकाश महाजन यांनी भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले प्रकाश महाजन?
“राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती विचार करुन घेतली आहे. कार्यकर्त्यांना त्यांची भूमिका समजायला थोडा वेळ लागेल. जे विरोधक आहेत जे स्वतःला सेक्युलर किंवा हिंदुविरोधी समजतात त्यांना अपेक्षा होती राज ठाकरे अशी काही भूमिका घेणार नाहीत. त्यांचा अपेक्षाभंग झाल्याने सोशल मीडियावर कोल्हेकुई सुरु झाली. विरोधक राज ठाकरेंवर एका वैफल्यातून बोलत आहेत.” असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
विरोधक राज ठाकरेंना गौण समजत असतील तर विरोधकांना पोटशूळ का?
विरोधक राज ठाकरेंना गौण समजत आहेत तर मग राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्यामुळे विरोधकांना पोटशूळ का उठला आहे? दुसरी बाब आहे कार्यकर्त्यांची. मनसेचे कार्यकर्ते हे काही संभ्रमात वगैरे नाहीत. लोकसभेची निवडणूक देशपातळीवर होत असते. हिंदुत्वाच्या प्रश्नावर नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. मी नेहमी सांगतो की मनसेचं हिंदुत्व हे शरीरावरच्या त्वचेसारखं आहे. त्वचा आणि शरीर वेगळ होत नाही तसं हिंदुत्व आमच्यापासून वेगळं होऊ शकत नाही. राज ठाकरेंना निर्णय जाहीर करण्याआधी माहीत होतं की त्यांच्यावर टीका होणार आहे. तरीही राज ठाकरेंनी भूमिका का घेतली? कारण देशात दोन बाजू पडल्या आहेत. त्यातली एक हिंदुत्वाची बाजू घेणारी आहे. राज ठाकरेंनी व्यापक हित पाहिलं आहे. २०१९ मध्ये त्यांनी ३७० कलम हटवलं. राम मंदिर उभं राहिलं, करोना काळात मोदींनी उत्तम काम केलं या सगळ्या दृष्टीकोनातून त्यांनी ही भूमिका घेतली आहे.
हे पण वाचा- “राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
भूमिका बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण
भूमिका बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. इंडिया आघाडीत जे लोक बसले होते त्यांनी किती भूमिका बदलल्या हे सांगितल्या तर दोन तास जातील. राज ठाकरेंनी भूमिका बदलली की त्यांच्यावर टीका करायची हे कसं चालेल? विरोधकांना काय बोलायचं ते बोलूदेत. राज ठाकरे काय आहे हे माहीत नसणारे लोक त्यांच्याविषयी बोलत आहेत.
राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण
राज ठाकरेंबाबत मला विचारलं तर मी सांगेन द्वापार युगात जसा एक कर्ण झाला तसे राज ठाकरे या आधुनिक युगातले कर्ण आहेत. कर्णाला माहीत होतं भिक्षुकाच्या रुपात इंद्र कवचकुंडलं मागायला आला होता. त्याला हे माहीत होतं की कवचकुंडलं दिल्यावर कुरुक्षेत्रावर मृत्यू होणार आहे तरीही त्याने हसत हसत कवचकुंडलं दान केली. हिंदुत्वाच्या नावाखाली जर कुणी मदत मागायला आलं तर राज ठाकरे मदत करणार नाहीत का? सध्या इतकी जहरी आणि बोचरी टीका राज ठाकरेंवर होते आहे. आम्ही हिंदुत्वाची शाल पांघरुन आलेल्या लोकांना मदत केली. मला या प्रसंगी चांगला शेर आठवतो, ‘रोशनी भीक मांगने घरपे आया था अंधेरा, हम अपना घर फुँकते नहीं तो क्या करते?’ कुणी मदत मागायला दारावर आलं आहे आणि मदत करणार नाही असं राज ठाकरे कधीच करणार नाहीत. राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र धर्माचा आहे. असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना कर्णाची उपमा दिली आहे.