मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात सोमवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीत मनसेच्या रुपाने नवा भिडू येणार का? याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता राज ठाकरे महायुतीत येणार हे स्पष्ट झालं आहे. याचं कारण आहे बाळा नांदगावकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हटलं आहे बाळा नांदगावकर यांनी?
“९ एप्रिलला गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्याच्या तयारीसंदर्भात आम्ही राज ठाकरेंशी चर्चा केली. दरवर्षी गुढीपाडव्याला राज ठाकरे मेळावा घेतात. त्यासंदर्भात आम्ही चर्चा केली. बाकी ज्या राजकीय गोष्टी आहेत त्यासंदर्भात दोन ते चार दिवस थांबा तुम्हाला सगळ्या गोष्टी समोर येतील.”
शिवसेना आणि मनसे एक होणार का?
एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र होण्याच्या चर्चा आहेत. यावर विचारलं असता बाळा नांदगावकर म्हणाले, “या सगळ्या चर्चा मी वृत्तपत्रात आणि वाहिन्यांवरच पाहिल्या आहेत. अशी काही चर्चा झाली आहे का? याची मला कल्पना नाही. जर तशी चर्चा झाली असेल तरीही त्याची माहिती ही राज ठाकरेच देऊ शकतील.” असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
मनसेने दिला तीन जागांचा प्रस्ताव
“मनसेने तीन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर दिला आहे. लोकसभेला मनसे तीन जागा लढवण्यास इच्छुक आहे असं महायुतीला राज ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यावर चर्चा सुरु होती. आता आम्ही दोन जागा मागितल्या आहेत. यावर राज ठाकरे आणि भाजपात चर्चा सुरु आहे. त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत हे राज ठाकरे सांगू शकतील. योग्य तो निर्णय पक्षप्रमुख म्हणजेच राज ठाकरे घेतील.” असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.