महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील हेही उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत राज्यातील टोल नाके आणि दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
राज्यातील टोल नाक्यांच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी १२ ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. राज्यातील जनता रोड टॅक्स भरते, मग टोलचा भार कशाला, असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना तेव्हा विचारला होता. यानंतर मंत्री दादा भुसे आणि अधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे यांची बैठक पार पडली होती. तसेच, अनेक टोलनाक्यांवर मनसेनं बसवलेल्या कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.
दुसरीकडे मराठी पाट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठी पाट्या लावण्याबाबत २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण, अद्यापही काही ठिकाणी मराठी पाट्या लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मनसेकडून मुंबई, पुणे आणि विविध ठिकाणी तोडफोड करण्यात येत आहे.
अशातच राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत टोल, मराठी पाट्या आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं.