गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. लोकांमधून देखील यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे राज्यातील सत्ताधारी पक्षांनी या भूमिकेला तीव्र विरोध केला असताना आता खुद्द मनसेमधूनच राज ठाकरेंच्या भूमिकेला कडवा विरोध पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पुण्यातील मनसेचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीच विरोध केला होता. मात्र, त्यांची पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मनसेच्या मुस्लीम बांधव पदाधिकाऱ्यांमध्ये या निर्णयावरून नाराजी असल्याचं चित्र या राजीनाम्यांमुळे निर्माण झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरेंची कडवी भूमिका!

मशिदींवरील भोंगे बंद न झाल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात केलं होतं. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज ठाकरेंनी राज्य सरकारला भोंग्यांविषयी निर्णय घेण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातील मुस्लीम बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

गुरुवारी मनसेचे कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला. यावेळी इरफान शेख यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट देखील टाकली. “आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’..!”, या मथळ्याखाली इरफान यांनी फेसबुकवर राजीनाम्याची पोस्ट लिहिलीय. “खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे,” असं स्पष्ट मत इरफान शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलं.

राज ठाकरेंना धक्का; भोंग्याच्या भूमिकेवरुन नाराज आणखी एका नेत्याचा राजीनामा; म्हणाला “आपण या जखमा…”

अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश

यानंतर इरफान शेख यांच्याप्रमाणेच मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई व मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लीम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमूद करण्यात आली आहे. यामध्ये सचिव, शहराध्यक्ष. प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray mns mumbai marathwada party bearers resigned on loudspeaker hanuman chalisa issue pmw