Raj Thackeray On Aurangzeb Controversy : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर राज ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘औरंगजेबाची सजवलेली कबर काढून तेथे एक बोर्ड लावा की मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“औरंगजेबाचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं? आफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून महाराष्ट्रात परत आले, राज्याभिषेक झाला आणि काही काळानंतर महाराजांचं निधन झालं. या दरम्यानच्या काळात औरंगजेबाचा एक मुलगा दक्षिणेत आला. त्या औरंगजेबाच्या मुलाला छत्रपती संभाजीराजे यांनी जागा दिली म्हणजे शह दिला. १६८१ ते १७०७ म्हणजे २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता. छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर औरंगजेब लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या. एका पुस्तकात एक फार चांगलं वाक्य आहे. मराठे सर्व लढाया हारत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता”, असं राज ठाकरे म्हणाले.
“औरंगजेबाने तेव्हा परत जायला पाहिजे होतं. मात्र, एवढ्या मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा महाराष्ट्रात ठाण मांडून का बसला होता? कारण औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण हे औरंगजेबाला जमलं नाही, सर्व प्रयत्न केले आणि शेवटी औरंगजेब येथेच मेला. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. तेव्हा जगभरातील लोकांना कळतं की औरंगजेब काय करायला गेला होता आणि कसा मेला. तेव्हा तेथे जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं”, असंही राज ठाकरे म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?
औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “औरंगजेबाची सध्याची सजवलेली कबर काढून टाका. तेथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत’
“सध्या परिस्थितीत मूळ विषयांकडे कोणाचंही लक्षच नाही. सर्व विषय भरकटले जातात. आम्हाला जंगलाचं पडलेलं नाही, पाण्याचं पडलेलं नाही. आम्हाला फक्त पडलेलं आहे औरंगजेबाचं. तो बसलाय द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की पाडली पाहिजे? हे विषय आत्ताच कसे आले? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाहीत. चित्रपट उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं का? अक्षय खन्ना चित्रपटात औरंगजेब बनून आल्यानंतर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला का? हॉट्सअॅपवर तुम्हाला इतिहास कळत नाही. त्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचायला लागतात. आता इतिहासावर कोणीही बोलायला लागलं आहे. विधानसभेतही औरंगजेबावर बोलतात”, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली.