Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025 Updates : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यावर टीका केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु असलेल्या वादावरही भाष्य केलं. तसेच चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“सध्या परिस्थितीत मूळ विषयांकडे कोणाचंही लक्षच नाही. सर्व विषय भरकटले जातात. आम्हाला जंगलाचं पडलेलं नाही, पाण्याचं पडलेलं नाही. आम्हाला फक्त पडलेलं आहे औरंगजेबाचं. तो बसलाय द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की पाडली पाहिजे? हे विषय आत्ताच कसे आले? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाहीत. चित्रपट उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं का? अक्षय खन्ना चित्रपटात औरंगजेब बनून आल्यानंतर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला का? हॉट्सअॅपवर तुम्हाला इतिहास कळत नाही. त्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचायला लागतात. आता इतिहासावर कोणीही बोलायला लागलं आहे. विधानसभेतही औरंगजेबावर बोलतात”, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली आहे.
गंगेच्या प्रदुषणाचं वास्तव दाखवत कुंभमेळ्यावर टीका
“गेल्या काही दिवसांत काही घटना घडल्या.त्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी कुंभमेळाव्यावर बोललो, तर काही हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशात नद्यांची जी भीषण अवस्था आहे, आपण नद्यांना माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे. मला आठवतं की गंगा स्वच्छ करावी यासाठी पहिला व्यक्ती मला आठतात ते म्हणजे राजीव गांधी. तेव्हा पासून आजपर्यंत गंगाच स्वच्छ करतात, पण ते काही झालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तेच सांगितलं. माझ्याकडे उत्तरेतील अनेक लोक येऊन गेले. ज्यांनी त्या ठिकाणी अंघोळ केली त्यामधील अनेकजण आजारी पडले. आता मी तुम्हाला गंगेची सध्याची परिस्थिती काय आहे ती दाखवतो”. यानंतर व्यासपीठावर एक क्लिप दाखवत गंगेतील प्रदुषणाचे व्हिडीओ दाखवला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आपल्या गोष्टीमध्ये सुधारणा करायला नको का? आता काळ बदलला, लोकसख्या वाढली. आधीच्या काळात गोष्ट वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता परिस्थिती वेगळी आहे. आता अशा प्रकारचे विधी करण्यासाठी घाटावर जागा करता आली असती ना. मग ते म्हणतात की लोक ऐकत नाहीत. आपल्या नद्या स्वच्छ राहायलाच पाहिजेत. आपण धर्माच्या नावाखाली नद्या बरबाद करत आहोत. आपल्या धर्मात सुधारणा केल्या गेल्या पाहिजे”, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.