महाराष्ट्रात अलीकडेच सत्तांतर घडलं असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही काहीवेळा भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा, शिंदे गट आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीबाबत मोठा खुलासा केला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आपण स्वतंत्र लढणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिंदे गट आणि मनसे या तीन पक्षात युती होणार का? याबाबत विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “भाजपा किंवा शिंदे गटाशी मनसेची युती होणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. यापूर्वीही मी हे जाहीर केलं आहे.”
हेही वाचा- “बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील” कोकण दौऱ्याआधी राज ठाकरेंचं विधान
खरं तर, राज ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी आज (मंगळवारी) त्यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्यापासून आपण कोकण दौरा सुरू करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात माझा पुढील दौरा असेल. या दौऱ्याच्या तारखा अजून निश्चित केल्या नाहीत. दुसऱ्या टप्प्यात मी कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. उद्या सकाळी १० वाजता अंबाबाईचं दर्शन घेऊन कोकण दौऱ्याला सुरुवात करणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.