Raj Thackeray on Code of Conduct Rule : महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागली आहे. १५ ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या प्रचारांचीही धामधुमी सुरू झाली आहे. दिवाळी संपल्यानंतर आजचा पहिला दिवस राज ठाकरेंनी गाजवला. कल्याण आणि ठाण्यातील प्रचारसभांमध्ये त्यांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केलं अन् त्यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी पूर्वी आचारसंहितेत वेळेच बंधन कसं असायचं यावर भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे म्हणाले, “मघाशी शरद पोंक्षे म्हणाले की राज ठाकरेंना वेळ नाही. पण माझ्याकडे खूप वेळ आहे, परंतु या आचारसंहितेवाल्यांना वेळ नाहीय. त्यामुळे दहाच्या आत आटपायला लागतं. पूर्वी बरं होतं, सन १९९५ ला आचारसंहिता लागली तेव्हा इतर माध्यमं नव्हती. आचारसंहितेचा एक कॅमेरा असायचा. जिथं जाऊ तिथे मागे मागे फिरायचा. मी विनोदाने सांगत नाही. एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत आला होता. मी त्याला विचारलंही की पुढचंही आपणच करणार आहात का?” असा गंमतीशीर अनुभव राज ठाकरेंनी सांगितला.

हेही वाचा >> Raj Thackeray : “लोकांच्या मनोरंजनाकरता बाई भोजपुरी गाण्यावर नाचतेय”, ‘त्या’ व्हायरल VIDEO वर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया!

अन् आम्ही पाऊण तास भाषण ताणायचो

ते पुढे म्हणाले, “पण एक कॅमेरा असायचा. त्या कॅमेऱ्यात जे शूट होईल ते होईल. त्यावेळी ते आम्हाला सोपंही जायचं. आम्ही दिवसाला सात-आठ सभा घ्यायचो. शेवटच्या सभेला साडेनऊ- पावणेदहा व्हायचे. मग शेवटचे पंधरा मिनिटं हातात असायची. पंधरा मिनिटांत करायचं काय? मग भाषणाची सुरुवातच अशी करायचो आम्ही. घड्याळ पाहायचो आणि म्हणायचो की आता सव्वानऊ झालेले आहेत. त्याच्या कॅमेऱ्यात सव्वानऊ रेकॉर्ड व्हायचं. मग पुढचे पाऊण तास आम्ही भाषण ताणायचो. आता हे हल्ली करता येत नाही. त्यामुळे आता दहाच्या आत आटपायला लागतं.”

मनसेच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात

राज ठाकरेंनी आज ठाण्यातील सभेत अभिनेते आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उपनेते शरद पोंक्षे आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची नात असिलता राजे यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. त्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “लग्न झाल्यामुळे आडनाव राजे लागलं. पण ही आमची असिलता सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची सख्खी नात. ही आणि मी आम्ही शाळेपासून शिशूवर्गापासून दहावीपर्यंत एकत्र वाढलो. आमचं फारसं बोलणं नव्हतं. मी अभ्यासात लोअर कॅटगरीतील होतो. ही भयंकर हुशार होती”, असं राज ठाकरे म्हणाले. “ती मनसेच्या व्यासपीठावर आली. लवकरच पक्षाच्याही कामाला लागेल अशी आशा करतो”, असंही राज ठाकरे मिश्किलेने म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on code of conduct rule shared a memory in thane sabha sgk