रावण पब्लिशिंग हाऊसतर्फे कुसुमाग्रजांच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह तयार करण्यात आला आहे. त्याचं प्रकाशन ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी ( २४ सप्टेंबर ) झालं. आपल्या आजूबाजूला निर्माण झालेली परिस्थिती आणि गढूळ झालेल्या राजकीय वातावरणावर साहित्यिकांकडून भाष्य होणं गरजेचं आहे, असं परखड मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.
राज ठाकरे म्हणाले, “आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही. मी इंग्लंडला गेल्यावर शेक्सपिअरचं घर पाहिलं. ते जपून ठेवण्यात आलं होतं. आमची माणसं किती मोठी होती. ती किती मोठी होऊन गेली हे सतत दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तो आपला नसतो. आपल्याकडे संमेलन भरतात. लोक येऊन बोलतात. पण, पुढे काही होत नाही.”
हेही वाचा : “अजित पवारांमध्ये डावललं जात असल्याची भावना”, खडसेंच्या विधानाला महाजन प्रत्युत्तर देत म्हणाले…
“आजूबाजुचं राजकारण गढूळ होत आहे”
“आपण कोण माणसं निवडून देतो, कोण आमच्यावर राज्य करतं, कुणाची किती लायकी आहे, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे. आजूबाजुचं राजकारण गढूळ होत आहे. भविष्यातील पिढ्यांना काय सांगणार आणि काय दाखवणार आहोत?” असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
“‘पन्नाशीची उमर गाठली’ कविती सर्वांनी वाचावी”
“भारत-इंडिया किंवा हिंदुस्तानाला काय जातंय ३ ही नावं घेण्यास, ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कुसुमाग्रजांनी ‘पन्नाशीची उमर गाठली’ ही कविता लिहिली होती. ही कविता मंत्रालयातही लावली होती. पण, जागा चुकली वाटतं,” अशी फटकेबाजी करत राज ठाकरे म्हणाले, “ही कविता महाराष्ट्रातील प्रत्येकानं वाचली पाहिजे.”
हेही वाचा : “अर्थखातं कधीपर्यंत टिकेल सांगता येत नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…
“चांगला अनुवाद करणारी माणस शोधत आहे”
“मराठीपण काय असते, हे जगाला कळण्यासाठी आपल्याकडील मराठी साहित्याचा इतर भाषेत अनुवाद होणे गरजेचे आहे. मी गेले अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करतोय. चांगला अनुवाद करणारी माणस शोधत आहे,” असेही राज ठाकरे यांनी म्हटलं.