विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (१७ जुलै) सुरू होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात एरव्ही सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याची चिंता असते. परंतु यंदा अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, त्यामुळे बदलेली राजकीय समीकरणं, विधान परिषदेत विरोधकांचं घटलेलं संख्याबळ यामुळे उद्यापसून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बिनधास्त आहेत. याउलट आपले अस्तित्व दाखवून सरकारची कोंडी करण्याचं मोठं आव्हान विरोधकांपुढे असेल. आगामी अधिवेशनातून राज्यातील जनतेला काय मिळेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. चिपळूण, दापोली येथे ते महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे मेळावे घेत आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. काही वेळापूर्वी राज ठाकरे एका बैठकीसाठी जात असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना थांबवून काही प्रश्न विचारले. परंतु राज ठाकरे यांनी फार बोलणं टाळलं. ते म्हणाले, राज्यात कुठल्या प्रकारचं राजकारण सुरू आहे? त्यांना (सत्ताधारी – विरोधक) जर असं वाटत असेल हे राजकारण आहे तर भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल? आपण सगळेजण याचा साधा विचार तरी करतोय का? कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केवळ सत्तेचं आणि स्वार्थाचं राजकारण सुरू आहे, हे फार घाणेरडं आहे.

यावेळी राज ठाकरे यांना ठाकरे यांना विचारण्यात आलं की, आगामी विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? यावर राज ठाकरे यांनी केवळ ‘घंटा’ असं म्हणत ते तिथून निघून गेले.

हे ही वाचा >> “पक्षात आत्ता दोन गट, परंतु भविष्यात…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य चर्चेत

रत्नागिरीतल्या दापोली येथे काल (शनिवारी) राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की, सध्या जे काही राजकारण राज्यात सुरु आहे ते भयंकर आहे. पुढे बघा आणखी किती ते गलिच्छ होतंय. हम करे सो कायदा अशी राज्यातली स्थिती आहे. अजूनही निवडणुका लागत नाही. कुणीही यावर काही बोलत नाही. मोबाइल फोन, सोशल मीडिया नावाचं जे माध्यम आलं आहे त्यावर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. पूर्वी लोक रस्त्यावर उतरायचे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचे. आत्ता असं काही घडत नाही. मोबाईलवर लोक व्यक्त होतात आणि शांत बसतात. लोक जोवर रस्त्यावर उतरत नाहीत तोवर हे राजकारण वठणीवर येणार नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on maharashtra assembly session 2023 asc
Show comments