Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत झालेल्या मेळाव्यात राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यावर टीका, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, बीडमधील संतोष देशमुख प्रकरण, महाराष्ट्रातील मराठी भाषेचा मुद्दा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजना अशा विविध विषयांवरून राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
तसेच मराठी भाषेवरून राज ठाकरे यांनी मोठा इशाराही दिला. ‘महाराष्ट्रासह मुंबईत मराठी बोलणार नसाल तर कानफटीतच बसणार’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
“आज महाराष्ट्राला चोहोबाजूने विळखा पडतोय. मराठी माणसांना विळखा पडतोय. पण हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजे. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रात, आमच्या मुंबईत आणि येथील आस्थपनांमध्ये आम्हाला सांगता की आम्ही मराठी बोलणार नाही. मराठी येत नाही तर काय झालं? कानफटीतच बसणार, देश वैगेरे आम्हाला सांगायचं नाही”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
‘उद्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत…’
“प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रात, मुंबईत मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे. उद्यापासून तयारीला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही हे तपासा. प्रत्येक आस्थापनेत मराठी वापरली जाते की नाही हे चेक करा. तुम्ही सर्वजण मराठी भाषेसाठी कडवटपणे उभे राहिले पाहिजे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत’
“सध्या परिस्थितीत मूळ विषयांकडे कोणाचंही लक्षच नाही. सर्व विषय भरकटले जातात. आम्हाला जंगलाचं पडलेलं नाही, पाण्याचं पडलेलं नाही. आम्हाला फक्त पडलेलं आहे औरंगजेबाचं. तो बसलाय द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की पाडली पाहिजे? हे विषय आत्ताच कसे आले? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाहीत. चित्रपट उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं का? अक्षय खन्ना चित्रपटात औरंगजेब बनून आल्यानंतर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला का? हॉट्सअॅपवर तुम्हाला इतिहास कळत नाही. त्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचायला लागतात. आता इतिहासावर कोणीही बोलायला लागलं आहे. विधानसभेतही औरंगजेबावर बोलतात”, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली.
औरंगजेबाच्या कबरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?
औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “औरंगजेबाची सध्याची सजवलेली कबर काढून टाका. तेथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.