Raj Thackeray on Marathi Language Dispute : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उफाळून आला आहे. राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पहिलीपासून हिंदी भाषेव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांचेही पर्याय उपलब्ध करून देण्याची शिफारस अभ्यासक्रम आराखडा सुकाणू समितीने केली होती. मात्र ही शिाफरस डावलून शिक्षण विभागाने हिंदीची सक्ती केल्याचं म्हटलं जातंय. यावरून सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता यावरून राज ठाकरे यांनीही रोखठोक भूमिका मांडली. ते अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. महेश मांजरेकरांनी या पॉडकास्टचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राज ठाकरे या प्रोमोमध्ये बोलत आहेत, “आपल्याकडे शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणं गरजेचं आहे. नुसता भाषा दिवस साजरा करणं किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने मराठी राहणार नाही. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती नको आम्हाला. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, हे दिसायला छान दिसतंय, पण यातून मराठी माणसाचं अस्तित्व संपत असेल तर आम्हाला असा विकास नको.”
ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी या शाळा आल्या. या शाळा देशभर सुरू झाल्या. यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. क्रांतीचा उगम म्हणतो आपण, त्यांचा इतिहास सांगता येत नाही. फ्रेंच रिव्हॉल्युशन शिकवता तुम्ही. ते काय करायचं आहे? आपण इतिहासातून काय बोध घेतोय, ते शिकवणं जास्त गरजेचं आहे.”
दरम्यान, महेश मांजरेकर यांनी घेतलेली मुलाखत शनिवारी वॅको सॅनिटी या युट्यूब चॅनेलवर वास्तव में ट्रूथ या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज ठाकरेंकडून आंदोलनाचा इशारा
केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे. यानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाचा समावेश करण्याचा आदेश सरकारने काढला. परंतु इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीस राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठीतर असा संघर्ष घडवून स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी सरकारचा हा सगळा अट्टाहास सुरू असून, मनसे तो कदापि खपवून घेणार नाही. शालेय अभ्यासक्रमातीली हिंदीची पुस्तके दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांनादेखील ती पुस्तके विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला. राज्य सरकारने वेळीच हा निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ असल्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी काल (१७ एप्रिल) एक्स पोस्टही केली होती.