Raj Thackeray On Ramesh Wanjale : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा पार पडत आहेत. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. सध्या अनेक नेत्यांकडून विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खडकवासला विधानसभा मतदारसंघात मयुरेश वांजळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांची आठवण सांगितली. ‘रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले होते. आज मला अनेकजण सोडून गेले. पण ते असते तर माझ्याबरोबर असते’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे काय म्हणाले?

“रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांच्या सभेसाठी मी आज या ठिकाणी आलो आहे. मयुरेश यांना मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं मांझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे हाच आला आहे. कारण त्याच्यासारखाचं दिसतो. मला तो दिवस अजूनही आठवतो. रमेश वांजळे हे जर शेवटचं कोणाशी बोलले असतील तर ते माझ्याशी बोलले. मी तेव्हा फोन केला होता, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की मी रुग्णालयात आलो असून एमआरआय काढायचा आहे. एमआरआय झाला की १० मिनिटात तुम्हाला फोन करतो, असं मला रमेश वांजळे म्हणाले. मी तेव्हा म्हटलं की हो फोन कर मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. मात्र, त्यानंतर मला १५ ते २० मिनिटांनी फोन आला आणि सांगितलं की ते आपल्यात राहिले नाहीत. तेव्हा मला काय बोलावं समजेना झालं. मात्र, मला बाकीचे अनेक जण सोडून गेले. पण आज रमेश वांजळे माझ्याबरोबर असते”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे ठिकठिकाणी मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवरही घणाघात करत आहेत. आज राज ठाकरे हे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना रमेश वांजळे यांची आठवण सांगितली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on ramesh wanjale remembrance told in khadakwasla assembly mayuresh wanjale maharashtra assembly elections 2024 gkt