Raj Thackeray on Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासूनच मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन उग्र केलं. परंतु, त्यांच्या आंदोलनाला अद्यापही पूर्णपणे यश लाभलेलं नाही. त्यांना सरकारकडून सातत्याने तारीख पे तारीख दिली जाते. परिणामी राज्यातील ओबीसी, मराठा आणि धनगर समाजात संताप निर्माण झाला आहे. या तिन्ही समाजात आपआपसांत कलह निर्माण झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली. आज ते सोलापुरात पाहणी (Raj Thackeray on Reservation) दौरा करायला गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाहीय. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत. बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मग महानगरपालिका हे स्तर लोकसंख्येनुसार वाढत जातात. एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो”, असं राज ठाकरे (Raj Thackeray on Reservation) म्हणाले.

हेही वाचा >> Raj Thackeray : “महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये”, राज ठाकरेंची खोचक टीका!

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी आरक्षणासह राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केलं. महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठे? महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही. मग किती जागांवर आरक्षण आहे? हे बघणंही गरजेचं आहे. मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातून हाताला काहीही लागणार नाही, असे ते (Raj Thackeray on Reservation) म्हणाले.

हेही वाचा >> Maharashtra News Live : “केवळ लोकसभेसाठी भाजपाला पाठिंबा दिला होता, विधानसभेचं…”; युतीबाबत विचारताच राज ठाकरेंची प्रतिक्रिया

जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने दूर ठेवावं

बाहेरच्या राज्यातील तरुण-तरुणी आपल्या राज्यात येतात आणि इथे शिक्षण-नोकऱ्या मिळवतात. या नोकऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळत नाही, याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. आज जातीपातीचं प्रकरण शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचलं आहे. यापूर्वी अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती. उत्तर प्रदेशात अशा गोष्टी होतात, असं ऐकलं होतं. आता हे लोन महाराष्ट्रात पोहोचलं आहे, महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने या निवडणुकीत दूर ठेवलं पाहिजे, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे (Raj Thackeray on Reservation) यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on reservation says maharashtra dont need any reseravtion sgk