एकीकडे महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी ‘रझाकारां’सोबतच ‘सजाकारां’चाही उल्लेख करत खोचक टीका केली आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
औरंगाबादमध्ये काय घडलं?
औरंगाबादमधील विजयस्तंभाजवळ दरवर्षी सकाळी नऊ वाजता होणारा शासकीय कार्यक्रम आज सकाळी सात वाजताच घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हैदराबादला अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असल्याने या कार्यक्रमाच्या वेळेत बदल केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. त्यापाठोपाठ शिवसेनेकडून औरंगाबादमध्ये सकाळी ९ वाजता पुन्हा एकदा ध्वजारोहण करण्यात आलं. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि शिवसेना यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांनंतर शिवसेनेनं पुन्हा केलं ध्वजारोहण; मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमावरून वाद पेटला!
या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी खुलं पत्र लिहून त्यातून आपली भूमिका मांडली आहे. “माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये”, अशी मागणी या पत्रातून राज ठाकरेंनी केली आहे.
“लवकरच मनसे त्यांचा बंदोबस्त करेल”
“संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत, तर आधुनिक सजाकारही येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे सजाकार. अर्थात, लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेलच”, असंही राज ठाकरे या पत्रात म्हणाले आहेत.
“रझाकारांचं लांगुलचालन करणारं सरकार..”
“मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी फारसं बोललं का जात नसेल? अर्थात रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्षं राज्यात होतं. त्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैवं असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी या पत्रातून अप्रत्यक्षपणे एमआयएमला लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे.