एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन पक्षाशी बंडखोरी केली आणि वेगळी चूल मांडली. पक्षापासून वेगळा गट स्थापन करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेंनी केलेल्या या मोठ्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला. तेव्हापासून शिवसेना नेते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की, उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बगल देऊन काम करत आहेत. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संसार थाटल्याचं आम्हाला आवडलेलं नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही नवा गट स्थापन केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणून पक्ष बनवला असून शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणदेखील मिळवला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते (उद्धव ठाकरे गट) आणि राज्यसभा खासदार संजय राऊत सातत्याने एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. नुकतेच ते टीव्ही ९ भारतवर्षच्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी राऊत यांना रॅपिड फायर (झटपट) प्रश्न विचारण्यात आले आहे. यामध्ये राऊत यांना विचारण्यात आलं की, बाळासाहेबांचा राजकीय वारस कोण? आणि त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा आणि दुसरा पर्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा होता.
हे ही वाचा >> “टायगर अभी जिंदा हैं!” मुंबई मनपा निवडणुकीआधी मनसेचं नवं स्फूर्तीगीत, पाहा टीझर
संजय राऊतांचं स्पष्ट उत्तर
या प्रश्नावर राऊत काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु राऊत म्हणाले की, “या दोघांपैकी कोणीही बाळासाहेबांचा राजकीय वारस नाही. जे लोक बाळासाहेबांना सोडून गेले ते त्यांचे वारस बनू शकत नाहीत.”