देशभरात काल (३० मार्च) देशभरात नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व राम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. त्याच वेळी अनेक ठिकाणी शोभायात्रादेखील काढण्यात आल्या. परंतु या काळात महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती, राडे आणि दंगली झाल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस ठाण्यावर दगडफेक, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ झाली. तसेच सामान्यांच्या वाहनांचीदेखील जाळपोळ झाली. यामुळे संभाजीनगरात तणाव निर्माण झाला होता. तर मुंबईतल्या मालवणी परिसरात देखील राम नवमी शोभायात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाला.
अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाल्याने आता विरोधी पक्ष राज्य सरकारवर टीका करू लागले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकार या दंगली प्रायोजित करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाने एमआयएमच्या मदतीने या दंगली केल्याचा आरोपही होत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा काही भाग व्हायरल केला आहे. यात राज ठाकरे भविष्यातल्या दंगलींच्यी शक्यता वर्तवत आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?
राज ठाकरे एका भाषणावेळी म्हणाले होते की, आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर एकदा धाडी टाका, काय-काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल. पाकिस्तानसारख्या शत्रूची आपल्याला गरजच नाही. उद्या जर काही घडलं, तर आतमधली परिस्थिती आवरता आवरता आपल्या नाकी नऊ येतील. इतक्या गोष्टी आत भरल्या आहेत. परंतु आपलं लक्ष नाही. यासोबत मनसेने संभाजीनगरमधील दंगलीचा व्हिडीओदेखील प्रसिद्ध केला आहे. यात पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ सुरू आहे.
राज ठाकरे म्हणाले की, अनेक मशिदी अशा आहेत, की ज्यांच्या आत काय सुरू आहे ते आपल्याला माहिती नाही, ही सगळी लोकं पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आले आहेत आणि आपण त्यांना स्वीकारलं आहे. आपल्या नगरसेवकांना, आमदारांना-खासदारांना याच्याशी काही देणंघेणं नाही. उलट आपले नेते यांना आधार कार्ड, शिधापत्रिका काढून देत असतात. आपलेच लोक त्यांना सर्वकाही पुरवतात. एक दिवस येईल जेव्हा सर्वांचे डोळे उघडतील.
हे ही वाचा >> संजय शिरसाटांवर काय कारवाई झाली? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “४८ तासांत…”
पाहा व्हिडीओ
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि म्हटलं आहे, ऐका आणि स्वस्थ बसा.