महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. उद्यापासून आपण कोकण दौरा सुरू करणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. “बालेकिल्ले हलत असतात, ते यापुढेही हलतील” असं विधार राज ठाकरेंनी केलं आहे.
पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, ” मी नागपुरलाही बोललो होतो, कोणताही लढा प्रस्थापितांच्या विरोधातच असतो, प्रस्थापितांच्या विरोधात दिलेल्या लढ्याला यश आलेलं तुम्ही १९९५ आणि १९९९ मध्ये तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळे बालेकिल्ले कुणाचे हलत नाहीत, असं काही नसतं, बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील.” असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.
हेही वाचा- शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार! ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडीचा होकार
माझा पुढचा दौरा पश्चिम महाराष्ट्रात असेल. या दौऱ्याच्या तारखा अजून निश्चित केल्या नाहीत. दुसऱ्यात टप्प्यात मी कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. उद्या सकाळी १० वाजता अंबाबाईचं दर्शन घेऊन कोकण दौऱ्याला सुरुवात करणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.