राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं, अशी विनंती करणारे बॅनर्स राज्यात अनेक ठिकाणी लागले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती, त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला होता.
यानंतर आता राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहे. मागील काही मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांची ही भेट पूर्वनियोजित होती, असं बोललं जात आहे. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अस्थिर असताना हे दोन नेते एकत्र आल्याने या भेटीचे तर्क वितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा- शरद पवारांना आणखी एक धक्का? अत्यंत विश्वासू माजी मंत्री अजित पवार गटाच्या वाटेवर
विशेष म्हणजे आज (शुक्रवार, ७ जुलै) सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही भावांमध्ये रक्ताचं नातं आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी इतर कुणाची गरज नाही, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसतील, असं बोललं जात आहे. पण आता अचानक राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.