राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजित पवारांच्या बंडखोरीला दोन दिवस झाले आहेत, मात्र अद्याप बंडखोरीबाबतचं चित्र स्पष्ट झालं नाही. याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीमागे बहुदा शरद पवारच असतील, अशी शक्यता राज ठाकरे यांनी वर्तवली. यावेळी त्यांनी याचं कारणंही सांगितलं आहे. अजित पवारांबरोबर गेलेल्या तीन नेत्यांवरही त्यांनी संशय उपस्थित केला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- सुप्रीम कोर्टाचा ‘तो’ निकाल बंडखोर आमदारांसाठी गळफास ठरेल; जितेंद्र आव्हाडांचं विधान

सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. जर तुम्ही जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. दुसरं तुम्हाला काहीही ऐकायला मिळणार नाही. हा मतदारांचा घोर अपमान आहे. यावर मी भाषणात अनेकदा बोललो आहे. या सर्व गोष्टींवर सविस्तर मेळावे घेणार आहे.”

हेही वाचा- “आम्हाला बहुमताची गरज नव्हती मग अजितदादांना का घेतलं? हाच प्रश्न…”, शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

“महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींची सुरुवात शरद पवारांनीच केली. त्यांनी १९७८ साली पुलोदचा प्रयोग केला. त्यापूर्वी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं. या सगळ्या गोष्टींची सुरुवात शरद पवारांपासून झाली आणि शेवटही शरद पवारांकडेच झाला,” असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात…”, रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत, रोख कुणाकडे?

शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, असं म्हणायचं आहे का? असं विचारलं असता राज ठाकरे पुढे म्हणाले, “मला वाटत नाही. बहुदा या सगळ्या गोष्टी त्यांनीच (शरद पवार) पेरल्या आहेत. कारण प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ ही माणसं अजित पवारांबरोबर जाणारी माणसं नाहीत. त्यामुळे ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात. संशयास्पद म्हणजे ती तीन माणसं अजित पवारांबरोबर जाऊन मत्रीपदं स्वीकारतील, असं वाटत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray reaction on ajit pawar rebellion sharad pawar ncp rmm
Show comments