महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून (१३ जुलै) कोकण दौऱ्यावर आहेत. ते आज चिपळूण, दापोली येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दापोलीत ते मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. राज्यात अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत. पक्षबांधणी करण्यासाठी ते आज कौकण दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंशी युती करण्याच्या प्रश्नावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, महाराष्ट्रात अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं, अशा आशयाचे बॅनर्स अनेक ठिकाणी लागले होते. तसेच राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता राज ठाकरे यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.

हेही वाचा- “ते दादांचं वैयक्तिक मत, माझं नाही”, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं विधान चर्चेत

चिपळून येथे मनसे कार्यकर्त्यांना काय संबोधन केलं? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “पक्षबांधणीच्या दृष्टीकोनातून माझे हे सगळे मेळावे सुरू आहेत. आता सगळ्या ठिकाणी माझे दौरे सुरू होतील. त्यामुळे वेळोवेळी तुम्हाला भेटतच राहू.”

हेही वाचा- “दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे…”, मिटकरींची आव्हाडांवर टोलेबाजी!

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशी अनेकांना उत्सुकता आहे, यावर तुमचं मत काय असं विचारलं असता राज ठाकरे क्षणभर थांबले आणि “हाहाहा” असं मिश्किल हसत निघून गेले. त्यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्याच्या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं आहे. पण सध्याच्या राजकीय हालचाली पाहता, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसेसह उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही याबाबत उघडपणे इच्छा व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray reaction on making alliance with uddhav thackeray faction mns chief konkan visit rmm
Show comments