मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज यश मिळाले. राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश काढले आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील जाहीर सभेत आपली भूमिका मांडली आणि कायद्यात बसणारे आरक्षण मराठा समाजाला देऊ, असे सांगितले. यामुळे मराठा समाजाचा नवी मुंबईत आलेला मोर्चा आता पुन्हा एकदा आपल्या गावाकडे वळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन व्यक्त केले. मात्र हे करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारण्याचाही सल्ला दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
“श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकीआधी पारदर्शकता येईल, ही अपेक्षा!”, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी एक्स अकाऊंटवर टाकली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात येऊ नये, यासाठी काल रात्री (२६ जानेवारी) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दीर्घ बैठक झाली. त्यानंतर सरकारचे अधिकारी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील गेस्ट हाऊस येथे मध्यरात्री पोहोचले. तिथे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. त्यानंतर आज सकाळी (२७ जानेवारी) वाशी येथे जाहीर सभा घेत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे जाहीर केले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेत उपस्थित होते. शासनाचा सुधारीत अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांचे उपोषणही सोडवले.
हेही वाचा – मराठा समाजाचे कैवारी अशी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:ची केली प्रतिमा तयार
या सात मागण्या मान्य
- जात प्रमाणपत्र वाटप करणाऱ्यांचा डाटा देणार
- सगेसोयऱ्यांना जातप्रमाणपत्र मिळणार
- आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे
- वंशावळी जोडण्याकरता शासननिर्णय
- शिंदे समितीला मुदतवाढ
- शिक्षणात ओबीसींप्रमाणे सवलत
- पुढील अधिवेशनात अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर
“मराठा समाजासाठी अध्यादेश काढलाच नाही, तो केवळ…”, छगन भुजबळांनी ठेवलं मुद्द्यावर बोट!
तुमचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही
मागण्या मान्य झाल्यानंतर वाशीमधील शिवाजी चौकातील सभेत बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू होता. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या परिवारातील लोकांनाही तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावं. ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगेसोयऱ्यांनासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी आपण येथे आलो होतो. साडेचार महिन्यांपासून आपण संघर्ष केला आहे. आपल्याला न्याय मिळावा आणि सगेसोयरेही आरक्षणात यावे याकरता अध्यादेश येणं गरजेचं होतं. या संघर्षात तुम्ही सर्वांनी साथ दिली. तुमची झालेली महाराष्ट्रातील एकी आणि तुमचा संघर्ष वाया जाऊ देणार नाही.”
“अध्यादेशाला काही धोका निर्माण झाला तर…”, मुख्यमंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय
दरम्यान याच शिवाजी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, “मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब मराठा समाजाचं दु:ख आणि वेदनेची कल्पना आहे. त्यामुळेच मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम आज मी करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहेत.”